सहा अट्टल मोटारसायकल चोरटे जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात
जिल्ह्यातून चोरीला गेलेल्या तब्बल 17 दुचाकी जप्त : आणखी चोर्या उघडकीस होण्याची शक्यता
जळगाव : अट्टल सहा दुचाकी चोरट्यांच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या असून आरोपींच्या ताब्यातून जिल्ह्यातील तब्बल 17 चोरीला गेलेल्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींच्या पोलिस चौकशीत आणखी काही चोर्या उघडकीस होण्याची दाट शक्यता आहे.
या आरोपींना अटक
दीपक गोपाळ कोळी (22, डांभूर्णी, ता.यावल), अजय ईश्वर कोळी (21, दहिगाव संत, ता.पाचोरा), संदीप राजू कोळी (19, कुरंगी, ता.पाचोरा), रमजानशहा शकूर शहा (19, कुरंगी, ता.पाचोरा), प्रवीण भाईदास कोळी (20, विखरण, ता.एरंडोल) व प्रशांत उर्फ गोलू निंबा कोळी (18, कुरंगी, ता.पाचोरा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
यांच्या पथकाने केली कारवाई
पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, चाळीसगावचे अपर पोलिस अधीक्षक सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम, उपनिरीक्षक सुधाकर लहारे, अशोक महाजन, कमलाकर बागुल, सुरज पाटील, दादाभाऊ पाटील, योगेश वराडे, परेश महाजन, दर्शन ढाकणे व चालक इद्रीस पठाण आदींच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
या गावातून लांबवल्या दुचाकी
आरोपींनी एरंडोल, धरणगाव, पिंपळगाव हरेश्वर, जामनेर, पहूर, पारोळा, पाचोरा आदी भागातून तब्बल 17 दुचाकी लांबवल्या. त्या संदर्भात संबंधित गावांच्या पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल आहे. आरोपींच्या ताब्यातून तब्बल पाच लाख 80 हजार रुपये किंमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या.

