शब्दांची ताकद आपल्याला ओळखता आली पाहिजे
सुनील धनगर : भुसावळात जागर प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे पारीतोषिक वितरण
भुसावळ : शब्दांची ताकद आपल्याला ओळखता आली पाहिजे कारण त्याचे रूपांतर धनात करता येऊन त्याचा वापर समाजासाठी व आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी करता येतो, असे मत पुणे येथील युवा वक्ते सुनील धनगर यांनी व्यक्त केले. जागर प्रतिष्ठानतर्फे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. जागर प्रतिष्ठानचा चतुर्थ वर्धापन दिन व वाचन प्रेरणा दिनानिमित्त चार गटात खास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. पंचायत समिती सभागृहात झालेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ.उल्हास पाटील होते
यांची प्रमुख उपस्थिती
व्यासपीठावर आमदार संजय सावकारे, जळगाव डाएटचे अधिव्याख्याता शैलेश पाटील, रावेरचे गटशिक्षणाधिकारी विजय पवार, हभप प्रा.रामकृष्ण पाटील, औरंगाबाद खंडपीठातील वकील अॅड.निर्मल दायमा आदींची पुमुख उपस्थिती होती.
वक्ता व लेखकात शब्दांची ताकद ओळखण्याची क्षम्ता
धनगर पुढे म्हणाले की, शब्दांची ताकद ओळखण्याची क्षमता वक्ते व लेखक या दोघांकडेही असते म्हणूनच एका कवीने म्हटले आहे की, अंतरीच्या वेदनांना लेखनाची वाट आहे, अंधारले वाटे जरी त्यापुढे पहाट आहे, ही पहाट निर्माण करण्याची क्षमता स्पर्धेत सहभागी होणार्या सर्व शिक्षकांमध्ये आहे. आज समाजाला उपक्रमशील शिक्षकांची गरज आहे. युवा शब्द उलट केला तर वायु होतो. युवकांमध्ये वायूच्या वेगाची प्रचंड शक्ती आहे. तिचा वापर विधायक कामासाठी करून घेण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे, असेही ते म्हणाले.
यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करा -डॉ.पाटील
माजी खासदार डॉ.उल्हास पाटील म्हणाले की, ज्या शिक्षणात ग्रोथ आहे त्या शिक्षणाकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर आपले लक्ष निश्चित करा आणि ते साध्य होईपर्यंत प्रयत्न सोडू नका. वेळेचे नियोजन हे महत्त्वाचे असून स्वतःबद्दल सकारात्मक दृष्टिकोन बाळगा, असे आवाहन त्यांनी केले. आमदार संजय सावकारे, शैलेश पाटील, अरुण मांडाळकर, विजय पवार आदींनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
स्पर्धेचा असा आहे निकाल
प्राथमिक शिक्षक गट- जितेंद्र गवळी, भाग्यश्री लोहार, रेखा पाटील, संजीवनी पाटील, निळकंठ पाटील, माध्यमिक शिक्षक गट- दिवाकर बडगुजर, आरती भंगाळे, भाग्यश्री तळेले, शैलेंद्र वास्कर, संदीप पाटील, डॉ.नरेंद्र महाले. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक गट- डॉ. कुंदा चौधरी, जगदीश ढोले, बापू ठाकूर, पंकज बडगुजर, संजय सूर्यवंशी. शिक्षकेतर कर्मचारी गट- ज्ञानेश्वर खराळे, विजय दीक्षित, रेखा झांबरे, मोहनदास महाजन, मनीष तांबोळी. विजेत्यांना प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
आमदारांचा सपत्नीक सत्कार
शहरातील सामाजिक कामात सतत पुढे असणार्या अष्टभुजा ज्येष्ठ नागरीक संघ व जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघ यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच सलग तिसर्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल आमदार संजय सावकारे यांचा पुस्तक देऊन जागर प्रतिष्ठानतर्फे सपत्नीक सत्कार करण्यात आला. जीवन महाजन यांनी जागर गीत सादर केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज पाटील यांनी प्रास्ताविक केले तर प्रकल्प प्रमुख श्रीकांत जोशी यांनी स्पर्धे मागील भूमिका स्पष्ट केली. मुख्याध्यापिका हेमांगिनी चौधरी यांनी सूत्रसंचालन केले तर अमित चौधरी यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी योगेश इंगळे, प्रदीप सोनवणे, अमित कुमार पाटील, विक्रांत चौधरी, ऋषिकेश पवार, श्रीराम सपकाळे, पवन पाटील, नरेंद्र पाटील, अॅड.हरीश पाटील, प्रा.निलेश गुरूचळ, कृष्णा तपोने, अतुल धनजे, अजित चौधरी, गोकुळ सोनवणे, गोविंदा लोखंडे, डॉ.जगदीश पाटील यांनी परीश्रम घेतले.

