आईच्या स्मरणार्थ सामाजिक संस्थांना लाखाची देणगी
बोदवडचे पत्रकार पुरुषोत्तम गड्डम यांनी समाजापुढे ठेवला आदर्श
बोदवड : आईच्या मृत्यूनंतर तेराव्याच्या खर्चासह अन्य इतर खर्च टाळून हा निधी गरजू सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेला देण्याचा आदर्श निर्णय बोदवडचे पत्रकार पुरुषोत्तम संभाजीराव गड्डम यांनी घेतला. इतकेच नव्हे तर दशक्रियेचा विधी तेराव्या दिवशी न करता पाचव्या दिवशी आटोपून घेत समाजापुढे आदर्श पायंडाही पाडल्याने त्यांच्या निर्णयांचे कौतुक समाजाकडून होत आहे.
अनावश्यक खर्चाला फाटा
पत्रकार तथा शिक्षक पुरुषोत्तम गड्डम यांच्या मातोश्री उमादेवी संभाजीराव गड्डम यांचे वयाच्या 88 व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले. निधनानंतर तेराव्याच्या कार्यक्रम त्यांनी पाचव्या दिवशी उरकून घेत तेराव्याच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन सुमारे एक लाख रुपयांची रक्कम सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेला दान करण्याचा निर्णय पुरुषोत्तम गड्डम, माधुरी गड्डम आणि परीवाराने घेतला.



पहिला चेक आत्मसन्मानला
समाजातील वंचित तथा गरजू घटकांना गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी झटणार्या आत्मसन्मान फाऊंडेशन या सामाजिक संस्थेला अधिक समाजकार्य करण्यासाठी बळ मिळण्यासाठी 25 हजार रुपयांचा धनादेश पुरुषोत्तम गड्डम व माधुरी गड्डम यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर, जिल्हा दूध संघाचे संचालक मधुकर राणे, सभापती गणेश पाटील, आत्मसन्मान फाऊंडेशनचे पदाधिकारी डॉ.प्रशांत बडगुजर, प्रा.बी.जी.माळी, अमोल पाटील, तसेच सचिन राजपूत, विनोद कोळी, कल्पेश शर्मा, पांडुरंग नाफडे, सूरज राजपूत तथा परीसरातील नागरीक उपस्थित होते. एक लाख देणगीतील उर्वक्षहत रक्कम समान पध्दतीने रु्रप एज्युकेशन सोसायटी, एणगाव संचलित गो. दे. ढाके विद्यालय तथा नाशिक येथील शिवपुत्र संभाजी राजे बहुउद्देशीय संस्थेला दान करण्याचा निर्णय पुरुषोत्तम गड्डम यांनी जाहीर केला. तेरावे किंवा अन्य धार्मिक कार्यक्रमावरील खर्चात कपात करुन वेळेची व पैशांची बचत करण्यात आली शिवाय ही रक्कम सामाजिक व शैक्षणिक संस्थेला दान केल्याने पत्रकार पुरुषोत्तम गड्डम यांचा समाजहिताचा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी अॅड.रोहिणी खडसे यांनी व्यक्त केले.
