जळगाव शिक्षण विभागाचा वरीष्ठ सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात
एक हजार 500 रुपयांची चाच भोवली : जळगाव एसीबीची सलग दुसर्या दिवशी कारवाई
जळगाव : तक्रारदार शिक्षक पत्नीची बालसंगोपन रजा मंजूर करण्यासाठी एक हजार 500 रुपयांची लाच स्वीकारणार्या जळगाव प्राथमिक शिक्षण विभागातील वरीष्ठ सहाय्यक चेतन भिका वानखेडे (42, प्लॉट नं.12, मोची नगर, गणपती मंदीराजवळ, धरणगाव) यांना जळगाव एसीबीच्या पथकाने बुधवारी दुपारी रंगेहाथ अटक केल्याने शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
सापळा रचून केली कारवाई
तक्रारदार व त्यांच्या पत्नी या शिक्षिका आहेत. तक्रारदार शिक्षक पत्नीने बालसंगोपन रजा मंजूर करण्यासाठी अर्ज केल्यानंतर आरोपी चेतन वानखेडे यांनी 20 रोजी एक हजार 500 रुपयांची मागणी केल्यानंतर जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आरोपी शिक्षण विभागाच्या इमारतीजवळ लाच घेण्यासाठी आल्यानंतर त्यास रंगेहाथ पंचांसमक्ष पकडण्यात आले. ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक निलेश सोनवणे, पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक निलेश लोधी व संजोग बच्छाव, नाईक मनोज जोशी, कॉन्स्टेबल प्रशांत ठाकुर, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर, महेश सोमवंशी आदींच्या पथकाने केली.

