साकळीत विद्यार्थ्यांचे एस.टी.रोको आंदोलन
यावल : यावल एस.टी.आगारातून मनवेल, थोरगव्हाण, शिरागड, पिळोदा येथे जाण्यासाठी बुधवारी केवळ एकच बस आल्याने संतप्त पासधारक विद्यार्थ्थ्यांनी दुसरी एस.टी. येत नाही तोपर्यंत पहिल्या बसला साकळीत रोखून आंदोलन केल्याने खळबळ उडाली. अखेर तासाभराने बस आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
बस न आल्याने विद्यार्थी संतप्त
तालुक्यातील मनवेल, शिरागड, थोरगव्हाण, पथराडे, पिळोदा खुर्द गावातील दिडशे विद्यार्थी शिक्षणासाठी मनवेल, साकळी, यावल येथे अप-डाऊन करतात. 150 पासधारक विद्यार्थी व प्रवासी असताा यावल आगारातून एकच एसटी सोडण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना एस.टी.त बसण्यासाठी जागा नसल्याने दुसरी बस येत नाही तोपर्यत पहिली एसटी जाऊ देणार नसल्याचा पवित्रा घेत बस रोखून धरली. आगार व्यवस्थापक शांताराम भालेराव यांचाशी संपर्क साधला असता आगारातील दुरध्वनीचा रीसीव्हर बाजुला ठेवण्यात आल्याने सारखा दूरध्वनी व्यस्त राहिला तर अखेर तासाभराने दुसरी बस आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. यावल आगारातून सुटणार्या अनियमित बसेसमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून पहिला तास व प्रार्थना सापडत नाही, शाळेतुन प्रार्थनेवेळी दिलेल्या सूचना समजत नसल्याने विद्यार्थ्यांनी बसेस नियमित सोडाव्यात, अशी मागणी केली आहे.

