विविध अर्थसहाय्याच्या 255 प्रकरणांना मंजुरी
रावेरच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे यांची माहिती
रावेर : शासनातर्फे देण्यात येणार्या विविध अर्थसहाय्याच्या योजनांच्या रावेर तालुक्यातील 255 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली असून विविध कारणांनी 274 प्रकरणे नामंजूर करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दिली. इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेंतर्गत 104 प्रकरणे तालुक्यातून दाखल झाली तर त्यातील 69 प्रकरणांना झालेल्या सभेद्वारे मंजुरी देण्यात आली. इंदिरा गांधी विधवा अर्थसहाय्य योजनेतील 13 लाभार्थीच्या
प्रकरणांना मंजुरी देण्यात आली तसेच श्रावणबाळ वृद्धापकाळ योजनेंतर्गत एकूण 335 प्रकरणे दाखल करण्यात आली. त्यापैकी 134 प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत तर विविध कारणांनी 201 प्रकरणे नामंजूर झालेली आहेत. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत 85 प्रकरणे मंजूरीसाठी सभेत ठेवण्यात आलेली होती. त्यापैकी 52 प्रकरणे मंजूर झालेली आहेत तर 33 प्रकरणे नामंजूर करण्यात आली.
अनेक कारणांनी प्रकरणे नामंजूर
इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी विधवा अर्थसहाय्य योजना, श्रावण बाळ निवृत्ती योजना व संजय गांधी निराधार योजनेतील एकूण 274 प्रकरणे निवड समितीने नामंजूर केलेली आहेत. लाभार्थींनी अर्ज दखल करतांना अपूर्ण माहिती भरणे, चुकीचा अर्ज दाखल करणे, वयाचा पुरावा न देणे, वय कमी असणे, वारस प्रतिज्ञापत्र न जोडणे, मुलगा सज्ञान असणे, प्रमाणित सही शिक्के नसणे, दारीद्य्र रेषेखालील दाखला नसणे, प्रकरण अर्ज नियमात न बसणे या अनेक कारणांनी ही प्रकरणे नामंजूर झालेली आहेत. नागरीकांनी या योजनंतर्गत प्रकरण दाखल करण्यापूर्वी योजनेची पूर्ण माहिती जाणून घेऊन अर्ज दाखल करणे आवशक आहे. त्यामुळे त्रृटी न राहता प्रकरण मंजूर होऊन लाभ मिळू शकतो, असे संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार एम.जे.खारे म्हणाले.

