स्वच्छतेसह पालिकेच्या कारभारावरुन जनआधारचे नगरसेवक संतप्त
अस्वच्छतेचे छायाचित्र जिल्हाधिकार्यांना देत पालिका कारभाराचा वाचला पाढा
भुसावळ : भुसावळ पालिकेत विविध विभागांचा आढावा घेण्यासाठी आलेल्या जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्यापुढे बैठकीनंतर जनआधार विकास पार्टीच्या नगरसेवकांनी शहरातील रस्ते, स्वच्छता तसेच पालिका कारभाराचा पाढा वाचून संताप व्यक्त केला. शहरातील अस्वच्छतेचे बोलके छायाचित्र जिल्हाधिकार्यांना देवून त्यांनी पालिकेच्या स्वच्छता मोहिमेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याप्रसंगी जिल्हाधिकार्यांनी समस्या ऐकून घेत मुख्याधिकारी व आरोग्य विभागाला दखल घेण्याच्या सूचना केल्या.
पालिकेच्या कारभारावर ठेवले बोट
जनआधार विकास पार्टीचे गटनेता उल्हास पगारे यांच्या नेतृत्वात नगरसेवकांनी जिल्हाधिकार्यांची भेट घेत शहरातील विविध भागात अस्वच्छतेमुळे डेंग्यू आजार पाय पसरवत असल्याची व्यथा मांडत आतापर्यंत अनेकांचा बळी गेल्याची व्यथा मांडली. जवाहर डेअरीनजीक अल्प रक्कम घेवून लाखोंचा रस्ता फोडण्यात आल्याची तक्रारही करण्यात आली तर पालिका रुग्णालयात बॅटरीच्या उजेडात प्रसुती होतात, रुग्णांना बाहेरून औषणी आणण्याचा सल्ला दिला जातो मात्र पालिका प्रशासन धूळ फेक करून आपल्याला माहिती पुरवत असल्याचा आरोपही नगरसेवकांनी केला. पालिका दवाखान्यात वैद्यकीय अधिकार्यांची पदे भरण्याचीही मागणी करण्यात आली.
विविध प्रश्नांबाबत जिल्हाधिकार्यांना निवेदन
जनआधार विकास पार्टीने जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनानुसार, पालिका स्वच्छतेबाबत गंभीर नाही. सर्व शहरात घाणीचे साम्राज्य पसरले असून शहरात मलेरीया, डेंग्यूसारख्या आजाराने थैमान घातले आहे. तक्रारी करूनही उपयोग होत नाही. पालिका दवाखान्यात मुबलक औषध साठा नसल्याने गोरगरीबांना खाजगीत महागडे उपचार घ्यावे लागत आहेत, पालिकेच्या अग्निशमन दलातील वाहनाचा डिझेल पंप खराब झाला असताना दुरुस्तीसाठी 35 लाखांचा खर्च अंदाज काढून घोटाळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे, सफाई कर्मचार्यांना सुविधा पुरवल्या जात नाहीत, जुना सातारा भागात सिमेंट रस्ता निकृष्ट दर्जाचा आहे, पथदिव्यांच्या कामातही अनियमितता असून या बाबींची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी गटनेता उल्हास पगारे, उपगटनेते जाकिर सरदार, संतोष (दाढी) चौधरी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे, दुर्गेश ठाकूर, आशिक खान शेरखान, प्रदीप देशमुख, निखील भालेराव, राहुल बोरसे, शेख साजीद, सचिन पाटील यांच्यासह जनआधारचे नगरसेवक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

