चाकूच्या धाकावर फायनान्स कर्मचार्याकडून दिड लाख लांबवले
वांजोळा-मिरगव्हाण रस्त्यावरील भर दिवसाची घटना
भुसावळ : वांजोळा-मिरगव्हाण रस्त्यावरून जाणार्या फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचार्यास दुचाकीवरून आलेल्या तिघांनी चाकूचा धाक दाखवत लुटल्याची घटना शुक्रवारी दुपारी 12.10 वाजेदरम्यान घडली. आरोपींनी वसुली कर्मचार्याकडील एक लाख 56 हजार 749 रुपयांची रोकड घेत मोंढाळ्याकडे पळ काढला. भुसावळनजीक भर दिवसा पडलेल्या दरोड्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चाकू पोटाला लावत लूट
भुसावळातील उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचा कर्मचारी उमेश रंगजान सपकाळ हे शुक्रवारी वांजोळा येथे 40 कर्जदारांकडून कर्जाचे हप्ते वसूल करून भुसावळकडे दुचाकी (एम.एच.19 डी.ए.4743) ने येत असताना रवींद्र फालक यांच्या शेताजवळील रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीस्वार युवकाने सपकाळ यांना थांबविले. सपकाळ यांनी गाडी थांबवताच संशयीत युवकाने चाकू पोटाला लावत सपकाळ यांच्याजवळील बॅग हिसकावून ती त्यांच्या डोक्यावर मारली तसेच शेताजवळ थांबलेले दोने युवक आल्यानंतर त्यांनी एकाच दुचाकीवरून ट्रीपल सीट वांजोळ्याकडे पळ काढला. सपकाळ यांनी तात्काळ बॅकेत व्यवस्थापक अमीत जाधव, मुकेश चौधरी, घनश्याम फेगडे आणि गोपाळ सपकाळे यांना माहिती कळताच तेही दाखल झाली. डीवायएसपी गजानन राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
बाजारपेठ पोलिसांची धाव
तालुका पोलिस दीपनगरात मोर्चात अडकल्यानंतर बाजारपेठ पोलिसांना माहिती कळताच पोलिस निरीक्षक दिलीप भागवत आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी धाावले. निरीक्षक भागवत यांनी कर्मचारी सपकाळ यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडून चोरीची घटना कशी घडली, याची माहिती जाणून घेतली. सपकाळ यांना तत्काळ त्यांच्याजवळ असलेले आणि एलसीबीकडून पाठविण्यात आलेल्या संशयीतांचे फोटोग्राफ दाखविले. सुमारे 28 फोटो यावेळी दाखविण्यात आले मात्र यातील कोणीही संशयीत नसल्याचे सपकाळ यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी केली मात्र काही उपयोग झाला नाही. पाळत ठेवत रस्तालूट करण्यात आल्याने या मार्गावरी.ल सकाळपासून 12 वाजेपर्यत येणार्या-जाणार्या रीक्षा चालकांना कोणी अनोळखी युवकांना या घटनास्थळावर पाहिले आहे, का, त्यांना कोणी ओळखते का, याचीही माहिती काढली जात आहे शिवाय पोलिस निरीक्षक भागवत यांनी गोजोरा येथे जाऊन तेथील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत सहायक फौजदार तस्लीम पठाण, शंकर पाटील, किशोर महाजन, संजय भदाणे, श्रीकृष्ण देशमुख, प्रशांत परदेशी आदी उपस्थित होते.

