देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी तर अजित पवारांची उपमुख्यमंत्रीपदावर वर्णी


मुंबई : राज्यात सरकार स्थापनेचा तिढा सुटत नसतानाच शनिवारी सकाळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्याच्या राजकारणात गेल्या महिनाभरापासून सरकार स्थापनेविषयी खल सुरू असतानाच अचानक अजित पवारांनी फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या कारणामुळे घेतला निर्णय -अजित पवार
24 ऑक्टोबरला निकाल लागल्यानंतरही सरकार बनले नाही त्यामुळे महाराष्ट्रासमोर मोठी संकटे असून शेतकर्‍यांवर संकट आले आहे. या समस्या सोडविण्यासाठी व निर्णय वेगवान करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. गेले एक महिनाभर चर्चा काही संपतच नव्हती. मार्ग निघत नव्हता. नको त्या मागण्या पुढे येत होत्या. हे पाहता आताच अशा समस्या येत असतील तर हे तीन पक्षांचे सरकार पुढे कसे टिकणार. यामुळे मी निर्णय घेतला, असे अजित पवार यांनी सांगितले.



सह्यांच्या पत्राचा गैरवापर -नवाब मलिक
अजित पवार यांनी कालच्या बैठकीच्या हजेरीच्या सह्यांचे पत्र नेले. त्याचा गैरवापर केला आणि शपथ घेतल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच राष्ट्रवादीचे सर्व आमदार शरद पवारांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सेना-राष्ट्रवादी आज दुपारी मांडणार भूमिका
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार आज दुपारी 12.30 वाजता संयुक्त पत्रकारपरिषद घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांचा हा वैयक्तिक निर्णय आहे. याला पक्षाचा पाठिंबा नसल्याचं पवारांनी म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादीच्या आमदारांना सायंकाळी 4.30 वाजता बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !