भुसावळात रेडिमेड दुकानासह घर फोडले
बाजारपेठ पोलिस ठाण्यासमोरच चोरी : गस्तीवर प्रश्नचिन्ह
भुसावळ : शहरात दररोज होणार्या चोर्यांसह घरफोड्यांमुळे नागरीक त्रस्त असतानाच शनिवारीदेखील रेडीमेड दुकानासह घरात चोरी झाल्याने नागरीक पुन्हा धास्तावले आहेत. पोलिसांच्या गस्तीसह कार्यक्षमतेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मात्र बाजारपेठ पोलिस ठाण्यासमोरीलच संदीप देवडा यांचे ‘देवडा रेडीमेड’ दुकान चोरट्यांनी पुन्हा फोडले असून स्वेटर, टी शर्ट, शर्ट, मॉर्निग वॉक ड्रेस लांबवण्यात आले. विशेष म्हणजे गत महिन्यातही 22 रोजी याच दुकानात चोरी झाली होती तर आता पुन्हा चोरी झाल्याने व्यापार्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दुसर्या घटनेत बद्री प्लॉट भागातील विरेंद्रसिंग पाटील यांच्या घराचा कडी कोंडा तोडून चोरट्यांनी सिगारेट, बिडी, मुखवास, चॉकलेट असा सुमारे 60 हजार रूपयांचा ऐवज लांबविला.
महिनाभरात दुसर्यांदा रेडिमेड दुकान फोडले
देवडा रेडीमेडमध्ये गत महिन्यात 22 ऑक्टोबरला चोरी झाली होती. त्यावेळी 50 हजारांचे दुकानातील साहित्य लांबवण्यात आले होते तर चोरीला एक महिना होताच पुन्हा 22 रोजी रात्री 12 नंतर चोरट्यांनी दुकानाचे पत्रे वाकवून चोरी केली. दुकानातील पीओपी तोडून चोरट्यांनी स्वेटर, बनियन, मोजे, टी.शर्ट आदी कपडे चोरून नेले. शनिवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास दुकानाचे व्यवस्थापक संदीप देवडा यांनी दुकान उघडल्यावर चोरी झाल्याचे लक्षात आले. शहर पोलिसांना चोरीची माहिती मिळताच हवालदार संजय पाटील व त्यांच्या सहकार्यांनी दुकानात जावून पाहणी केलेी.
बद्री प्लॅाटमध्ये 60 हजारांची चोरी
बद्री प्लॉट भागातील के.पी. क्लब भागातील रहिवासी विरेंद्रसिंग पाटील हे दुमजली घरात राहतात. वरील मजल्यावर ते स्वत: राहतात तर खालच्या मजल्यावरील घरात त्यांच्याकडे असलेल्या विविध एजन्सीचे होलसेल साहित्य ठेवण्यात आले आहे. चोरट्यांनी या घराचे कूलूप तोडून घरातील सिगरेट, वीडी, मुखवास आणि चॉकलेट मिळून सुमारे 60 हजारांचा साहित्य लांबवले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

