वैज्ञानिक दृष्टीकोन विकासासोबतच समाजासह देशाला पुढे नेतो
कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील : लोहारा माध्यमिक आश्रमशाळेत विज्ञान मेळाव्याचा शुभारंभ
फैजपूर : आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असून त्यांना आवश्यक सोयी सुविधा पुरविल्या तर देशाच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा असेल. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव हे शहरी भागातील विद्यार्थ्यांसोबतच आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता ओळखून सर्व विद्यार्थ्यांना योग्य असे व्यासपीठ उपलब्ध करून देईल असे मत कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांनी व्यक्त केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत सिलेज बेस्ड एरीया डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि विज्ञान प्रसार, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने आदिवासी मुलांसाठी दोन दिवशीय विज्ञान मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. तापी परीसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या सहकार्याने सातपुडा विकास मंडळ पाल संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी माध्यमिक आश्रम शाळा, लोहारा येथे शुक्रवारी विज्ञान मेळाव्याचा शुभारंभ झाला.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.पी.आर.चौधरी होते. विशेष अतिथी म्हणून दिलीप रामू पाटील, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग मुंबईचे सल्लागार डॉ.अजित पाटणकर, समन्वयक प्रा.डॉ.एस.टी.बेंद्रे, दीपक पाटील, नितीन बारी, अजित पाटील, प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील, डॉ.अरुणा चौधरी, जीवन पाटणकर, प्रा.डॉ.के.जी.कोल्हे, प्रभात चौधरी, धनंजय चौधरी, सुधाकर झोपे, लियाकत जमादार आदी मान्यवर उपस्थित होते.



अचूक मार्गदर्शनाची गरज -डॉ.अजित पाटणकर
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिवासी बाल विज्ञान मेळाव्याचे समन्वयक प्रा.डॉ.सतीश चौधरी यांनी केले. आदिवासी भागातील मुलांच्या जाणिवा समृद्ध करणे आणि बालवयापासूनच विज्ञानाची आवड वृद्धिंगत करणे हा हेतू या कार्यक्रमाच्या आयोजनामागील आहे, असे समन्वयक डॉ.सतीश चौधरी यांनी सांगितले. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे सल्लागार डॉ.अजित पाटणकर यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्षमतांचे कौतुक करीत जे काम आपल्याला साठ वर्षात करता येणे शक्य नाही तेही आदिवासी मुले फक्त सहा वर्षात पूर्ण करू शकतील मात्र त्यासाठी अद्ययावत सोयीसुविधा आणि अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.
तर समाज विकासाला हातभार -दिलीप रामू पाटील
राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परीषद सदस्य दिलीप रामू पाटील म्हणाले की, स्व.बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनीच आदिवासी भागात शिक्षणाचे बिजारोपण केले. शिक्षणासोबतच संस्कारांची जोड असणे आवश्यक आहे विद्यापीठाच्या योजना आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि तसे झाल्यास समाज विकासाला हातभार लागेल. स्थानिकांच्या समस्या ओळखून त्यांचे निराकरण केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. सूत्रसंचालन प्रा.राजश्री नेमाडे तर आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.अनिल सरोदे यांनी मानले. यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचार्यांनी परीश्रम घेतले.
