साकळीतील तलाठी कार्यालयाच्या भिंतीस तडे!


यावल : तालुक्यातील साकळी येथील तलाठी कार्यालयाच्या भिंतीला मोठे-मोठे तडे पडलेले असून सदर इमारत अतिशय धोकादायक बनली आहे. इमारतीचा कोणता भाग केव्हा पडेल ? हे सांगता येत नाही. संबंधीत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नवीन इमारत बांधण्यासंदर्भात तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

जीर्ण इमारतीस गेले तडे
साकळीत सध्या ‘चावडी’ वर तलाठी कार्यालय आहे. ही इमारत जवळपास 40 व 50 वर्ष जूनी असून या ठिकाणी काही वर्षापूर्वी ग्रामपंचायतीचे सुध्दा कार्यालय होते व त्याला लागूनच तलाठी कार्यालय आणि मंडळ अधिकारी यांचेही कार्यालय आहे. दोन्ही कार्यालयांच्या संबंधीत कामकाजासाठी मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग या ठिकाणी येत असतो. त्याचप्रमाणे इतरही शासकीय योजनांचा कामकाजासाठी वृद्ध महिला व पुरुष येत असतात व दररोज सदर कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी हजर असतात मात्र ही इमारत जुनी व जीर्ण झाल्याने भिंतीस मोठ-मोठे तडे पडलेले आहे. काही भाग या धोकेदायक बनल्याने नागरीकांच्या व कर्मचार्‍यांच्या जीवास धोका निर्माण झालेले आह तसेच कार्यक्षेत्र मोठे असल्याने येथे कार्यालयीन कामकाजाचा व्यापही मोठा आहे.

तातडीने समस्या सुटण्याची अपेक्षा
कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षीत राहण्यासाठी नवीन कार्यालयाची नितांत गरज आहे. त्याचप्रमाणे कार्यालयाची खोली छोटी व अरूंद असल्याने नागरीकांची गर्दी वाढल्यास बसायला व उभे राहतांना सुद्धा जागा नसते व कार्यालयात गर्दी होत असते तसेच या ठिकाणी प्रसाधनाची सुद्धा व्यवस्था नाही.
दरम्यान, इमारतीची सध्याची दुर्दशा पाहता व नवीन इमारतीची गरज लक्षात घेता सदर नवीन इमारत बांधकामाचा प्रस्ताव संबंधित महसूल प्रशासनाच्या वरीष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला असून या इमारतीच्या गंभीर समस्येकडे संबंधितांनी लक्ष देऊन नवीन इमारत बांधकामाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी सर्वच स्तरातून केली जात आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !