चाळीसगावचे कवी व चित्रकार दिनेश चव्हाण यांचा राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मान


चाळीसगाव : महाराष्ट्र राज्य, साहित्य संस्कृती मंडळ व ईगतपुरी तालुका साहित्य संस्कृती मंडळ यांच्या विद्यमाने वाडीवर्‍हे इगतपुरी येथील इंदुमती लॉन्स मध्ये रविवार, 24 रोजी झालेल्या 21 व्या राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनात चाळीसगाव येथील चित्रकार तथा कवी दिनेश चव्हाण यांना त्यांचा संघर्षमय कलाप्रवासाबद्दल कला क्षेत्रासाठीचा एकमेव कलारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी नाशिकच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर (वीर), मराठा विद्याप्रसारक मंडळाच्या नीलिमा पवार, अध्यक्ष कवी विवेक उगलमुगले, प्राचार्य डॉ.दिलीप धोंडगे, प्रमुख ज्येष्ठ साहित्यीक भारत ससाणे, डॉ.रवींद्र सपकाळ, राणकवी तुकाराम धांडे, ज्योतिराव कदम, अँड, संदीप गुळवे, ह,भं, प मनोहर धोंडे, ज्येष्ठ साहित्यीक पुंजाजी मालुंजकर, तसेच शासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी चित्रकार दिनेश चव्हाण यांना शाल, मानपत्र, स्मृतिचिन्ह, पुस्तक संच, मानधन देऊन वरील मान्यवरांनी गौरव केला. त्यावेळी चित्रकार चव्हाण यांनी कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष कवी विवेक उगलमुगले यांचे शीघ्र रेखाटन करून त्यांना भेट दिले. यावेळी उपस्थित सारेच भारावले. संपूर्ण व्यासपीठ व रसिकांनी चव्हाण यांचे टाळ्यांच्या जल्लोषात कौतुक केले. कवी, साहित्यिक व कलात्मक मन असलेल्या दिनेश चव्हाण यांना अनेक पुरस्कार या अगोदर मिळाले आहेत. त्यांनी महाराष्ट्रात विविध सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, राजकीय आदी 42 ठिकाणी लोबो दिले आहेत, शिवाय महाराष्ट्रभर कवी साहित्यिकांचा कलाकृतींना 38 मुखपृष्ठ दिले आहेत, व्यंगचित्र, कथाचित्र, काव्यरेखाटन, शीघ्ररेखाटन, पोट्रेट आदी प्रकारात ते पारंगत आहेत. शिवाय कविता, कथा,लेख, चारोळ्याही साहित्य प्रकारही ते हाताळतात. त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !