पाल कृषी विज्ञान केंद्राला राज्यस्तरीय उत्कृष्ट जलसंवर्धक संस्था पुरस्कार
रावेर : सातपुडा विकास मंडळ पाल संचलित कृषी विज्ञान केंद्रामार्फत गेल्या पाच वर्षांपासून रावेर व यावल तालुक्यातील गावामध्ये मोठ्या जलक्रांतीच्या चळवळीस सुरुवात झाली आहे. प्रामुख्याने पावसाचे पडणारे पाणी जिरवणे, पाणी संवर्धन पध्दती, नदीत चर खोदणे, लहान ओढ्यांवर बांध घालणे व वृक्ष लागवड असे वेगवेगळे उपक्रम लोकसहभागातून करण्यात आली आहेत.त्याचसोबत शासनाच्या जलशक्ती अभियान अंतर्गत पाणी संवर्धनासाठी जन जागृती शेतकरी मेळावा आयोजित करून पाणी चळवळ ही लोक चळवळ होण्यासाठी प्रयत्न सुरू केलेला आहे. संस्थाध्यक्ष व आमदार शिरीष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विज्ञान केंद्राची वाटचाल सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवार, 24 रोजी नाशिक येथील कृषीथॉन प्रदर्शनात राज्यस्तरीय उत्कृष्ट जलसंवर्धक संस्था म्हणून पुरस्कार आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील (पाटोदा,जि-औरंगाबाद) व मान्यवर खासदार हेमंत गोडसे, आमदार नितीन भोसले, नगरसेवक प्रकाश मते, ठक्कर, प्रकाश सांगळे आदींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अजित पाटील, प्रभात चौधरी, संजय महाजन, डॉ.धीरज नेहेते, महेश महाजन, प्रमोद सरोदे, शरद तायडे, मिलिंद होले, मयूर नारखेड आदींनी पुरस्कार स्वीकारला.
जलसंधारण कामांचा निर्धार
गतकाळात जलसंधारणासाठी गावातील सर्वच स्तरातील नागरीकांनी एकजुटीने अहोरात्र श्रमदान व लोकसहभागातून काम करून गावशिरात लाखो लिटर पाणी अडवून या वर्षी जिरवले तसेच त्याचबरोबर वृक्षांचे लागवड करून संवर्धन केले.
पुढील काळात न थांबता एकजुटीचे दर्शन घडवत विविध जलसंधारणाची व इतर महत्वाची कामे करण्याचा निर्धार संस्थेने केला आहे.

