भुसावळात एकाच दिवशी पाच दुकाने फोडली


शहरात चोरटे मुक्कामी : आता बंद घरानंतर दुकानांना चोरट्यांगडून टार्गेट : पोलिसांच्या गस्तीसह कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह

भुसावळ : शहरात एक दिवसाआड होणार्‍या चोर्‍या-घरफोड्यांनी नागरीक भयभीत असतानाच मंगळवारी पहाटे तब्बल पाच बंद दुकाने चोरट्यांनी फोडल्याने व्यावसायीकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. शहरातील वाढत्या चोर्‍या-घरफोड्यांसह वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिस प्रशासनाच्या भूमिकेविषयी सर्वसामान्य नागरीकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गुन्हेगारांना धडकी भरेल अशी कृतीच होत नसल्याने आयतेच गुन्हेगारांना रान मोकळे मिळाले असल्याचा टिका समाजमनातून होत आहे. दरम्यान, मंगळवारी शहरातील डिस्को टॉवरमधील दोन दुकानातून 40 हजारांच्या रोकडसह दोन मोबाईल तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील रूप टाईल्समधून पाच हजारांच्या रोकडसह दोन मोबाईल चोरट्यांनी लांबवले तर अन्य दोन दुकाने फोडली मात्र फारसा मुद्देमाल त्यांच्या हाती लागला नाही. मंगळवारी पहाटे चोर्‍या उघडकीस आल्याने व्यावसायीकांमध्ये घबराट पसरली.

एकाच दिवशी पाच दुकाने फोडली
आठवडे बाजारात नंदूसेठ मकडीया यांचे डिस्को टॉवर नावाचे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने विक्रीचे शोरूम आहे तर त्याच्या बाजूलाच त्यांचे बंधू मकडीया हेदेखील इलेक्ट्रॉनिक्स स्पेअर पार्ट विक्री करतात. नेहमीप्रमाणे मकडीया बंधूंनी सोमवारी रात्री दुकाने बंद करीत घर गाठले तर मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाच्या शटरला लावलेली कुलूप लोखंडी टॉमीने फोडत शटरखाली दगडे ठेवून दुकानात प्रवेश केला. नंदूसेठ मकडीया यांच्या दुकानातील ड्रावरमधून 25 हजारांची रोकड तसेच दोन मोबाईल तसेच त्यांचे बंधू मकडीया यांच्या दुकानातून 15 हजारांची रोकड लांबवत चोरट्यांनी धूम ठोकली. यानंतर चोरट्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बद्रीसेठ अग्रवाल यांच्या रूपटाईल्स या दुकानातील शटरचे कुलूप तोडून दुकानातील पाच हजारांची रोकड, दोन मोबाईल व दोन मिठाईचे बॉक्स लांबवले तर या दुकानाजवळ असलेल्या शालिमार ट्रेडर्स व कापसे अ‍ॅटो मोबाईल दुकानाचे कुलूप तोडण्यात आले मात्र चोरट्यांना आतमध्ये फारसे काही गवसले नाही तर कापसे अ‍ॅटो मोबाईल दुकानातून दोन ऑईलचे डबे चोरीला गेल्याचे सांगण्यात आले.

चोर्‍या-घरफोड्यांमुळे व्यावसायीक भयभीत
शहरात एक दिवसाआड चोर्‍या-घरफोड्यांचे सत्र सुरू असताना चोरट्यांना रोखण्यात पोलिस प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याने नागरीक संतप्त झाले आहेत. विशेषतः आतापर्यंत चोरट्यांनी बंद घरांना टार्गेट केल्याचे चित्र असताना आता चोरट्यांनी दुकानांकडे मोर्चा वळवल्याने व्यावसायीकांमध्ये घब्राट पसरली आहे. दिवसा टेहळणी करून रात्री काम फत्ते करीत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त न केल्यास जनक्षोभ वाढण्याची दाट शक्यता आहे.

आरएफायडी तंत्रज्ञान ठरले शो पीस
पोलिसांनी गस्त प्रॉपर केली आहे वा नाही यासाठी शहर व बाजारपेठ हद्दीत आरएफआयडी तंत्रज्ञानावर आधारीत चीफ लावण्यात आल्या आहेत मात्र रात्रीच्या वेळी गस्तीवर कर्मचारी नोंदणीच करीत नसल्याने वा प्रॉपर गस्त होत नसल्याने आयतेच चोरट्यांना रान मोकळे लाभले आहे. वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी या संदर्भातही दखल घ्यावी, अशी अपेक्षा आहे.

पोलिसांकडून बैठकांचा फार्स
वाढत्या चोर्‍यांच्या पार्श्‍वभूमीवर रात्रीच्या गस्तीदरम्यान पोलिस कर्मचार्‍यांनी विशिष्ठ ठिकाणी जाऊन सेल्फी घ्यावी, तो फोटो प्रभारी अधिकार्‍यांच्या मोबाईलवर पाठवावा. शहरातील प्रत्येक गल्लीबोळात रात्रीची गस्त करा, अशी सूचना डीवायएसपी गजानन राठोड यांनी सोमवारी पोलिस अधिकार्‍यांच्या बैठकीत दिल्या आहेत. रात्री संशयीत हालचाली करणार्‍यांची कसून चौकशी करा, बाहेरगावाहून येणार्‍या प्रवाशांचे तिकीट तपासा, सिनेमाचे कारण सांगणार्‍यांकडील तिकीट तपासा, चौकशी पूर्ण होईपर्यंत कुणालाही सोडू नका, असे डीवायएसपींनी बजावले असलेतरी सूचनांची काटेकोर अंमलबजावणी अपेक्षित आहे.

गस्त वाढवणार -दिलीप भागवत
वाढत्या चोर्‍या-घरफोड्यांच्या पार्श्‍वभूमीवर उपअधीक्षकांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले जाईल तसेच पोलिस कर्मचार्‍यांची गस्तीसाठी संख्या वाढवण्यात येणार असल्याचे बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी सांगितले. व्यापार्‍यांनी देखील आपापल्या दुकानांमध्ये सीसीटीव्ही लावणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !