बोदवड तालुक्यातील अपूर्ण कामे 15 दिवसात लागणार मार्गी


बोदवड तालुका पत्रकार संघाच्या दणक्याने बांधकाम विभागाला आली जाग

बोदवड : तालुक्यात रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कंत्राटात लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार बोदवड तालुका पत्रकार संघाने केल्यानंतर 28 पासून उपोषण छेडण्याचा इशारा दिला होता. पत्रकार संघाच्या इशार्‍याची बांधकाम विभागाने गांभीर्याने दखल घेत 15 दिवसात अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे लेखी आश्‍वासन दिले असून संबंधितांनी कामे न केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर गुरुवारपासूनचे उपोषण मागे घेण्यात आले.

उपोषणाच्या इशार्‍यानंतर नरमले प्रशासन
बोदवड तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत देण्यात आलेल्या कामानंतर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने अपघाताची मालिका सुरू होता. संबंधित विभागाकडे पत्र व्यवहार केल्यानंतर दखल घेतली जात नसल्याने बोदवड तालुका पत्रकार संघाने गुरुवार, 28 पासून उपोषणाचा इशारा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर आमरण ऊपोषण सुरू करण्यात आल्यानंतर सर्व वृत्तपत्रांच्या पत्रकारांनी त्यात सहभाग नोंदवला नायब तहसीलदार व बांधकाम उपविभागाचे अभियंता यांनी येत्या 15 दिवसांत संबंधित कामे केली जातील, असे लेखी पत्र दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

दखल न घेतल्याने संताप
2017 ते 2019 पर्यंत खड्डे बुजण्याचे कंत्राट जळगाव येथील गजानन इंटरप्रायझेस यांना देण्यात आले मात्र गतवर्षात एकदाही खड्डे न बुजल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी झोपा काढत होते का? असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वरखेड येथील एका गरीब कुटुंबातील महिलेचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली. त्यानंतर अनेकांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे तक्रारी केल्या मात्र गजानन इंटरप्रायजेसच्या मुख्य ठेकेदाराने मात्र बोदवड तालुक्यातील एका राजकीयय पक्षाच्या पदाधिकार्‍याला काम दिल्याचे सांगत संबंधीत दुर्लक्ष करीत असल्याचे भूमिका घेतल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले.

बांधकाम विभागाने लेखी पत्राद्वारे दिले आश्वासन
बोदवड तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत दखल घेतली असून संबंधीत ठेकेदार यांना सर्व रस्त्यांच्या त्वरीत दुरुस्तीबाबत कळविले आहे. त्यान्वये रस्त्यांची दुरुस्ती सुरु आहे. या प्रकरणात ठेकेदार यांनी कसूर केल्यास भविष्यात ठेकेदाराला कुठल्याही निविदा प्रक्रियेत सहभाग घेता येउ नये याकरिता कार्यकारी अभियंता यांना पत्राद्वारे कळवण्यात आले असून बोदवड तालुक्यातील संबंधित गजानन इंटरप्रायझेस या ठेकेदाराकडील एएमसी अंतर्गत मंजुर कामांच्या अंदाजपत्रकानुसार उर्वरीत कामे येत्या 15 दिवसांत करून घेण्यात येतील, असे पत्रात नमूद आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !