ऊस तोड मजुरांची पीकअप जीप नदीपात्रात कोसळून आठ जण ठार


विंचूर शिवारातील बोरी नदीपात्रात कोसळले वाहन : चौघे गंभीर : 19 जण किरकोळ जखमी : रस्ता दुरुस्तीसाठी नागरीकांचा रस्ता रोको : अपघातानंतर चालक पसार

धुळे : मध्य प्रदेशातील धवल्यागीर येथील ऊस तोड मजुरांना उस्मानाबादकडे घेऊन निघालेली भरधाव महेंद्रा पीकअप जीप चाळीसगाव-विंचूर रस्त्यावरील विंचूर गावाजवळील बोरी नदीपात्रात कोसळून झालेल्या अपघातात आठ जण ठार झाले तर चार जण गंभीर असून 19 जण किरकोळ जखमी झाले आहेत. शनिवारी पहाटे 12.30 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर चालक तसेच मजुरांना घेण्यासाठी आलेले दोघे पसार झाले मृतांमध्ये एका पुरूषांसह दोन महिला, तीन लहान मुली, दोन लहान मुले व दोन लहान मुलींचा समावेश आहे तर एकाच कुटुंबातील तिघांचा या अपघातात करुण अंत झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली.

नदीतील खडकावर वाहन आदळल्याने आठ जण ठार
सूत्रांच्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील धवल्यागीर येथून महेंद्रा पीकअप (क्रमांक एम.एच.25 पी.3770) मधून ऊसतोड मजुरांना घेवून चालक सागर भारत तांबारे (आंदोरा, ता.कळंब, जि.उस्मानाबाद) व मजुर घेण्यासाठी आलेले किरण कवडे व सुजीत तांबारे हे उस्मानाकडे जात असताना विंचूर शिवारातील बोरी नदीपात्रात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन नदीपात्रातील खडकावर कोसळून झालेल्या अपघातात सात जण ठार तण 19 जण जखमी झाले. अपघातात वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला तर शनिवारी मध्यरात्री झालेल्या अपघातानंतर जखमींना मदतीसाठी अक्षरशः टाहो फोडला. स्थानिक नागरीकांनी जखमींना रुग्णवाहिकेतून पोलिसांच्या मदतीने हलवले.

अपघातात आठ जणांचा ओढवला मृत्यू
या अपघातात रीतेश लेदाराम आर्य (06 महिने), जिन्या अंबू पावरा (13), मियाली लेदाराम आर्य (23), रविना लेदाराम आर्य (5), करण सेवासिंग बारेला (3), हरमसिंग सेवासिंग बारेला (5), लालसिंग अंबू पावरा (20) यांचा जागीच मृत्यू झाला तर गुड्डीबाई तुफानसिंग बारेला (30, सर्व रा़ धवल्यागिरी ता.सेंधवा, जि.बडवानी, मध्यप्रदेश) यांचा उपचार सुरू असताना हिरे रुग्णालयात मृत्यू झाला.

अपघातानंतर पोलिसांची धाव
अपघातस्थळी अपर पोलिस अधीक्षक राजू भुजबळ, उपअधीक्षक श्रीकांत घुमरे, पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, पोलिस निरीक्षक गायकवाड, सहाय्यक निरीक्षक सारीका कोडापे, उपनिरीक्षक कैलास चौधरी व धुळे तालुका पोलिस ठाण्याच्या कर्मचार्यांनी धाव घेतली.

ग्रामस्थांचा रस्ता रोको
अपघातानंतर बोरी पुलाच्या दुरुस्तीसह रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी रस्ता रोको केल्याने काही वेळासाठी वाहतूक ठप्प झाली होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !