लाकडाची वाहतूक करणारा ट्रक ब्रेक फेल होताच कन्नड घाटात कोसळला : चालकाचा जागीच मृत्यू, क्लीनर बचावला
The driver was killed when a truck fell into a ravine at Kannada Ghat near Chalisgaon चाळीसगाव : लाकडाने भरलेला ट्रक कन्नड घाटातून जाताना ब्रेक फेल झाल्याने नियंत्रण सुटून चालकासह ट्रक 100 फूट खोल दरीत कोसळला. यात चालक लाकडाखाली दाबला गेल्याने त्याचा मृत्यू झाला. तर ट्रक दरीत कोसळताना क्लिनरने वेळीच उडी मारल्याने तो बचावला. कन्नड घाटात मोठा महादेव मंदिराजवळ रात्री 12.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. महामार्ग पोलिसांनी शोध मोहिम राबवल्यानंतर सकाळी चालकाचा मृतदेह हाती लागला.
ब्रेक फेल झाल्याने दुर्घटना
आंध्र प्रदेशकडून चाळीसगावच्या दिशेने लाकडाने भरलेला ट्रक (एपी- 16, पीजी- 3553) येत होता. हा ट्रक कन्नड घाटात खाली उतरत असताना मोठा महादेव मंदिराजवळ ट्रकचे ब्रेक अचानक फेल झाले. यामुळे चालक रामू सत्यम (वय 41, रा. सदाशिवणी पालण, ता. सत्यमपल्ली, जि. खमम, तेलंगणा) याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर हा ट्रक लाकडांसह जवळपास 100 फूट खोल दरीत कोसळला. ट्रक दरीत कोसळत असताना क्लिनरने उडी मारल्याने तो सुदैवाने बचावला. मात्र,चालक रामू सत्यम हा ट्रकसह खोल दरीत कोसळला.

सकाळी आढळला मृतदेह
पुन्हा महामार्ग पोलिस व ग्रामीण पोलिस ठाण्याच्या कर्मचार्यांनी बुधवारी सकाळी ज्या दरीत ट्रक कोसळला होता. तेथे चालकाचा शोध घेतला. चालक रामू सत्यम हा ट्रकच्या लाकडांखाली दाबल्याने तो मृत अवस्थेत मिळून आला. क्रेनच्या सहाय्याने चालकाचा मृतदेह दरीतून काढून तो शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
रात्री अंधारात राबवली शोधमोहीम
घाटात ट्रक कोसळल्याची माहिती महामार्ग पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी क्लिनरला रूग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले. तर जवळच्या हॉटेल चालकांकडून दोरखंड मागवून रात्री अंधारात खोल दरीत उतरून चालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधारामुळे चालकाचा शोध घेता आला नाही. या दरम्यान घाटात वाहतूक कोंडी झाल्यानंतर ती सुरळीत करण्यात केली. या मदत कार्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश पाटील, पोलिस हेडकॉन्स्टेबल गणेश काळे, मिलिंद सोनवणे, पोलिस नाईक धनराज पाटील, नितीन आगोने, कॉन्स्टेबल गणेश पवार यांनी सहकार्य केले.
