जळगाव जिल्ह्यात आजपासून तीन दिवस पावसाची हजेरी : हवामान खात्याचा अंदाज ठरला खरा
Presence of rain in Jalgaon district for three days from today : The prediction of Meteorological Department came true जळगाव : हवामान विभागाने राज्यातील जळगाव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांना पुढचे दोन ते तीन दिवस पावसाचा इशारा दिल्यानंतर गुरुवारी दुपारी पावणेतीन वाजता जिल्ह्यातील भुसावळसह लगतच्या परीसरात विजांच्या गडगडाटात जोरदार पावसाला सुरूवात झाल्याने शेतकरी सुखावला आहे.
गेल्या जुलै महिन्यात राज्यासह जळगाव जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी दिली होती मात्र गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसाने उसंत घेतली आहे. परंतु अशातच आता हवामान खात्याने 4 ते 7 ऑगस्टदरम्यान पुन्हा पावसाचा इशारा दिला होता.
4 ते 7 ऑगस्टदरम्यान पावसाचा इशारा
मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात आजपासून पुढच्या दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी जोरात वारे वाहण्याची शक्यता असून काही ठिकाणी सोसाट्याच्या वार्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी आजपासून 4 ते 7 ऑगस्ट दरम्यान हलक्या ते मध्यम पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुरुवारप्रमाणेच पुढील दोन दिवसांत पाऊस पुन्हा सक्रिय झाल्यास खरिपाच्या पिकांना त्याचा फायदा होणार आहे. दरम्यान, जळगाव शहरासह तालुक्यासाठी नवसंजीवनी असलेली वाघूर नदी यंदा अजूनपर्यंत खळाळून वाहिलेली नाही. त्यामुळे अजिंठा डोंगररांगात जोरदार पाऊस होण्याची जिल्ह्याला प्रतीक्षा आहे.

