मुलीच्या लग्नात वाचनालयासाठी दिली 31 हजारांची पुस्तके
वाचन संस्कृती विकसीत होण्यासह प्रशासकीय सेवेत विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढण्यासाठी शिक्षक दाम्पत्याचा उपक्रम
फैजपूर : वाचन संस्कृती विकसीत व्हावी व प्रशासकीय सेवेत विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढावी या हेतूने स्पर्धा परीक्षांची पुस्तके वाचनालयात उपलब्ध करून देण्याकरिता आपल्या मुलीच्या लग्नाचे निमित्त साधून शिक्षक दाम्पत्यांने 31 हजार रुपयांचा धनादेश भुसावळ येथील सार्वजनिक वाचनालयाला प्रदान केला.
शिक्षक दाम्पत्याकडून वाचन संस्कृतीला बळ
भुसावळ येथील दयाराम शिवदास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील उपशिक्षक ललितकुमार निळकंठ फिरके व न्हावी, ता.यावल येथील भारत विद्यालयातील उपशिक्षिका संगीता फिरके यांची सुकन्या तेजश्री हिचा शुभविवाह किशोर पुरुषोत्तम जावळे यांचे चिरंजीव कुणाल उर्फ कृष्णा यांच्याशी रविवार, 1 डिसेंबर 2019 रोजी गोरज मुहूर्तावर फैजपूर येथे पार पडला. शिक्षक दाम्पत्य असलेल्या दोघांनी आपल्या मुलीच्या लग्नाचे औचित्य साधून वाचन संस्कृतीला बळ देण्याचे ठरवले आणि त्यानुसार वधू-वरांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत भुसावळ येथील सार्वजनिक वाचनालयाला मदत भेट म्हणून देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार लग्न सोहळा पार पडत असताना भुसावळ येथील सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल नितीन तोडकर यांना व्यासपीठावर बोलविण्यात आले. श्री स्वामीनारायण गुरुकुलचे अध्यक्ष शास्त्री भक्तीप्रकाशदासजी स्वामी यांच्या हस्ते तोडकर यांना 31 हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी शास्त्री भक्तीस्वरूपदासजी, मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन, शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अनिल लढे, प्रा.आर.वाय.पाटील, भरत महाजन, सुनील चौधरी, वधू तेजश्री, वर कुणाल उर्फ कृष्णा, नवरदेवाचे वडील किशोर पुरूषोत्तम जावळे, आई ललिता जावळे, वधूचे वडील ललितकुमार फिरके, आई संगीता फिरके, आजोबा नीळकंठ रामदास फिरके, कुसूम श्रीधर फिरके, डॉ.दीपक पाटील आळंदी देवाची यांच्यासह भाऊबंध, नातेवाईक, हितचिंतक, मित्रपरिवार अशा हजारो वर्हाडी मंडळी उपस्थित होते. यावेळी शास्त्री भक्तीप्रकाशदासजी म्हणाले की, अत्यंत प्रेरणादायी व कौतुकास्पद काम फिरके दाम्पत्यांने केले असून इतरांसाठी आदर्श पायंडा घालून दिला आहे. विद्यार्थी हित जोपासण्याचे काम खर्या अर्थाने शिक्षक म्हणून या दोघांनी केले असून विद्यार्थ्यांनी या पुस्तकांचा उपयोग स्पर्धा परीक्षा देण्यासाठी करावा आणि यश मिळवावे, असे आवाहन त्यांनी केले. ग्रंथपाल नितीन तोडकर यांनी धनादेशाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची नवनवीन पुस्तके वाचनालयात उपलब्ध करून देण्यात येतील आणि विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे सांगितले. सूत्रसंचालन डॉ. जगदीश पाटील यांनी तर आभार ग्रंथपाल नितीन तोडकर यांनी मानले.

