पुण्यातील सराफा दुकानातील दरोड्यात जळगावातील बडतर्फ पोलिसाचा सहभाग


जळगाव : जळगाव पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलेल्या पोलिसानेच एका सहकार्‍याच्या मदतीनेच पुणे शहरातील कोथरुडमधील पेठे ज्वेलर्स या दुकानात पिस्तुलाच्या आधारावर दरोडा टाकल्याचे निष्पन्न झाले असून त्याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज घेवून आरोपींच्या शोधार्थ पुणे पोलिसांचे एक पथक सोमवारी जळगावात आले होते. पुण्याच्या पथकाने पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांची भेट घेत चर्चा केली. सूत्रांच्या माहितीनुसार, तीन वर्षापूर्वी जामनेर पोलिस स्टेशनला दाखल दरोड्याच्या गुन्ह्यात या पोलिसाचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर तत्कालीन पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी या कर्मचाजयाला सेवेतून बडतर्फ केले होते. आता पुण्याच्या दरोड्यातही त्याचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.

पिस्तुलाच्या धाकावर दुकान लुटले
कोथरुड येथे 24 नोव्हेंबर 2019 रोजी भरदिवसा दुपारी साडे चार वाजता पेठे ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानात दोघांनी प्रवेश करीत गावठी पिस्तुल मंगेश वेदक यांच्या दिशेन रोखत दुकानातून 10 लाख 19 हजार 600 रुपयांचे सोन्याचे दागिने लुटले होते. या प्रकरणी मंगेश मनोहर वेदक (रा. काळभोरनगर, पुणे) यांच्या फिर्यादीवरुन कोथरुड पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी तपास करीत आहेत. दरम्यान, या सोन्याच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात संपूर्ण घटना कैद झाली असून दरोडेखोरांचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत. हे फुटेज राज्यभर व्हायरल झाले आहेत. त्यावरुन त्यातील एक जण जळगावचा बडतर्फ पोलीस असल्याचे चौकशीत उघड झाले आहे. दुकानातून निघाल्यानंतर दोघं संशयित गळ्यात बॅग अडकवून रस्त्याने काही अंतर चालत गेले आहेत. जळगाव पोलिसांकडे हे फुटेज प्राप्त झाले आहे शिवाय या दरोड्यात दोघांनी ज्या दुचाकीचा वापर केला, ती दुचाकी जळगावातून चोरल्याचे निष्पन्न झाले. या दुचाकीमुळे दरोडेखोर जळगाव जिल्ह्यातील असावेत, असा संशय तेथील पोलिसांना आला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !