हावडा एक्स्प्रेसमधून 22 लाखांचे दागिने लांबवणारी त्रिकूट एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात
MIDC police nabs trio who smuggled jewelery worth 22 lakhs from Howrah Express जळगाव : हावडा एक्स्प्रेसमधून सुमारे साडेबावीस लाखांचे दागिने लांबवणार्या त्रिकूटाच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. कुरीअर कंपनीत डिलिव्हरीत नोकरी म्हणून सोन्याचे दागिने पोहोचवण्याचे काम करणार्या 64 वर्षीय वृद्धाच्या ताब्यातून रविवार, 7 ऑगस्ट रोजी हावडा एक्स्प्रेसमधून दागिने लांबवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. भावना जवाहरलाल लोढा, तनिष्का भावना लोढा व अनिल रमेश चौधरी (रा. अयोध्यानगर, जळगव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून 14 लाख सात हजार 300 रुपये किंमतीचे 19 तोळे सोने जप्त करण्यात आले. संशयीतांना न्यायालयाने 12 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
हावडा एक्स्प्रेसमधून लांबवले सोने
हरीश्चंद्र खंडू वरखेडे हे (64) हे कुरिअर कंपनीत नोकरीला असून ते जळगावात सोने बनवणार्या सराफाचे मुंबईत डिलिव्हरीचे काम करतात. रविवार, 7 रोजी ते तीन सराफाचे 22 लाख 43 हजारांचे सोन्याचे दागिने घेऊन हावडा एक्स्प्रेसने जात असताना पाचोरा रेल्वे स्टेशनजवळ सतवीर बलवंतसिंग टाक व त्याचा साथीदार रहिम (दोन्ही रा. जळगाव) यांनी खिडकी बंद करण्याच्या बहाण्याने वरखेडे यांची सोन्याचे पार्सल असलेली पिशवी घेऊन पळ काढला. वरखेडे यांनी सहप्रवासी व रेल्वे पोलिसांच्या मदतीने एका चोरट्याला पकडले परंतु त्यापूर्वीच चोरट्यांनी आपल्या दुसर्या साथीदाराकडे काही सोने देऊन तो चालू गाडीतून उतरून पसार झाला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या टाक याची चौकशी केली असता त्याचे इतर साथीदार शिरसोली नाका परीसरात आल्या बाबतची माहिती पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाल्यानंतर बुधवारी पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, किशोर पाटील, छगन तायडे, अश्विनी इंगळे यांनी तिघा आरोपींच्या मुसक्या बांधल्या.

