सात महिन्यात 31 लाख दंड वसूल


रावेर महसूल पथकाची दिवसभरात तीन ट्रॅक्टर-ट्रॉलीवर धडक कारवाई : कारवाईत सातत्य हवे

रावेर : रावेर तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या मालका कडून मागील सात महिन्यात 31 लाखांचा दंड महसूल विभागाकडून वसूल करण्यात आला असून यापुढे देखील अश्याच पध्दतीच्या धडक कारवाईसत्र सुरू राहणार असल्याची माहिती महसूल नायब तहसीलदार संजय तायडे यांनी ‘जनशक्ती’शी बोलताना दिली.

मध्यरात्री वाळूची तस्करी
रावेर तालुक्यातून भोकर, सुकी, मात्राण, नागोई, नद्यांसह तापी नदीदेखील वाहते त्यामुळे मोठा वाळूचे साठे या नद्यांमध्ये आढळतात. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत या नद्यांमधून अवैध पध्दतीने वाळूची वाहतूक केली जाते. वाळू माफियांविरुद्ध महसूल विभागातर्फे धडक कारवाई सुरू असून मागील सात महिन्यांमधे मोठ्या कारवाईच्या माध्यमातून 31 लाखांचा दंड महसूल विभागाकडून वसुल करण्यात आला आहे. फिल्डवर काम करणार्‍या काही तलाठ्यांकडून मात्र या प्रकाराकडे जाणून-बुजुन दुर्लक्ष होत असल्याची ओरड होत आहे.

सव्वा लाखाचा आहे दंड
रावेर तालुक्यातील एकाही नद्यांचा वाळू संदर्भात ठेका झाला नसून नदी पात्रातुन अवैध वाळू वाहतूक केल्यास महसूल प्रशासनातर्फे सव्वा लाखाचा दंड आकारण्यात येतो मात्र तरीदेखील रात्रीच्या अंधारात नद्यांमधूनअवैधरीत्या वाळू वाहतुक अनेक भागात सुरूच आहे. याकडे महसूल विभागाने आपला मोर्चा वळवला आहे.

दिवसभरात तीन ट्रॅक्टर-ट्रॉलीवर कारवाई
मंगळवार, 3 रोजी महसूलच्या भरारी पथकाने सकाळी खिरोदा प्र.यावल येथे संदीप जैस्वाल यांच्या पथकाने कारवाई केली. अजुन दोन अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर-ट्रॉलीवर कारवाई करण्यात आली असून या पैकी एका चालकाने वाळुची ट्रॉली खाली करीत महसूल पथकाशी कामात अडथळा निर्माण करीत ट्रॅक्टरसह पळ काढल्याचे सूत्रांनी सांगितले.

कारवाईत सातत्य राहणार
तालुक्यातील वाळू वाहतूकदारांनी ठेका झाल्यावरच परवाना काढूनच वाळूची वाहतूक करावी, अवैध वाळू वाहतूक करणार्‍यांवर पुढेदेखील अश्याच कारवाईची संक्रात येतच राहणार आहे. यासाठी आम्ही वेगवेगळे पथके तयार केले असून ते पुढील दिवसात अवैध वाळू वाहतूक करणार्‍यांकडून दंड वसूल करून कारवाई करण्यात येणार असल्याचे नायब तहसीलदार संजय तायडे यांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !