पिंपळकोठा गोळीबार प्रकरणी अल्पवयीन संशयीत जाळ्यात
पारोळा : पिंपळकोठा येथील यात्रोत्सवात गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याप्रकरणी अल्पवयीन आरोपीस पारोळा पोलिसांनी शिर्डी येथुन ताब्यात घेतल आहे. यात्रेदरम्यान पूर्ववैमनस्यतून झालेल्या भांडणात आरोपीने गावठी कट्ट्यातून हवेत फायर करुन भांडण सोडवण्यास गेलेले चेनेश्वर पाटील यांच्या पोटात गावठी कट्टयाने फायर करीत जखमी केल्याची घटना घडली होती. घटनेनंतर आरोपी साथीदारांसह पसार झाला होता. सुरुवाीला बाळा उर्फ तुषार प्रदीप पाटील (नवलनगर) यास धुळे येथुन पारोळा पोलिसांनी अटक केल्यानंतर अन्य आरोपी शिर्डीत असल्याची माहिती मिळाली होती.
गोपनीय माहितीवरून अटक
पारोळा पोलिस ठाण्याचे निरीक्षक लिलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील हवालदार जगदीश पवार, रवींद्र रावते, कॉन्स्टेबल पंकज राठोड, सुनील साळुंखे, किशोर भोई यांनी शिर्डीतील सावळी फाटा येथे अल्पवयीन आरोपी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या मुसक्या आवळल्या. अन्य आरोपी सागर पाटील व गौरव पाटील हे शिर्डीतील एका हॉटेलच्या बाहेर बसले असल्याचे सांगितले मात्र त्यांचा शोध घेतले असता ते गवसले नाहीत. दरम्यान, आरोपींनी अमळनेरातील दुचाकी चोरीसह जानवेजवळ रस्ता लूट केल्याची बाब उघड झाली असून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

