घनकचरा व्यवस्थापन शुल्क त्वरीत रद्द करावे : शिवसेनेची मागणी
‘अ’ वर्ग असलेल्या नगरपालिकेचा कारभार आता ‘ढ’ वर्गाकडे
भुसावळ : नाशिक विभागात एकमेव ‘अ’ वर्ग असलेल्या येथील नगरपालिकेचा कारभार मात्र आता ‘ढ’ वर्गाकडे सुरू असून सध्या शहरातील रस्ते, स्वच्छता व हद्दवाढ भागातील नालीचा प्रश्न मोठे आहेत. चर्चा, आंदोलन, भेटीगाठी होऊनही यावर तोडगा निघालेला नाही. हद्दवाढ भागातील रस्त्यांचा प्रश्न असतानाच आता भुसावळ शहरातील रस्त्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. अमृत योजनेमुळे विविध कारणांसाठी खोदकाम सुरू आहे. काही भागांत नव्याने रस्ते करण्यात आलेत मात्र ते रस्तेही फोडण्यात आलेत त्यामुळे रस्ते करून काहीच फायदा झाला नसल्याची ओरड नागरीकांची असल्याचे गार्हाणे मांडत घनकचरा व्यवस्थापन शुल्कापोटी आकारला जाणारा कर रद्द करण्याची मागणी शिवसेना पदाधिकार्यांनी गुरुवारी पालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली.
आधी सुविधा मगच कर
शहरातील कचर्यांवर महिन्याकाठी लाखो रुपयांचा खर्च सुरू आहे. यानंतरही शहरातील कचरा प्रश्न सुटलेला नाही. उलट मुख्य चौकातच कचर्याचे ढिगारे साचलेले आहेत परीणामी, स्वच्छतेचा पैसा चालला कुठे? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. शहरात विविध कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याचे सांगितले जात आहेत. प्रत्यक्षात इतका निधी खर्च झाल्याचे कुठेही दिसत नाहीत. उलटस्थिती पूर्वीच्या तुलनेत अधिक गुंतागुतीची झाल्याच्या नागरीकांच्या तक्रारी आहेत. घनकचरा व्यवस्थापन शुल्क रुपये 360 प्रति वर्ष लादून नारीरकांनाच आर्थिक भुर्दंड दिला गेला आहे. नागरीकांना मात्र हा कर अमान्य असून तो त्वरित रद्द करावा, अशी मागणी शहरातील नागरिकांनी व भुसावळ शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी उपमुख्याधिकारी सोमनाथ कोठुळे यांच्याकडे गुरुवारी केली. आधी सुविधा द्या नंतरच कराची मागणी करा, अशी भुमिका शिवसैनिकांनी घेतली.



प्रजासत्ताक दिनी आंदोलनाचा इशरा
घनकचरा व्यवस्थापक शुल्क त्वरीत रद्द न झाल्यास नागरीकांच्या माध्यमातून शिवसेना व सर्व अंगीकृत संघटनांच्या वतीने 26 जानेवारी 2020 रोजी सकाळी 8 वाजता भुसावळ नगरपालिका कार्यालयावर मोर्चा आणून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना पदाधिकारी बबलू बर्हाटे, हिरामण पाटील, योगेश बागुल, भुराताई चव्हाण, प्रा.विनोद गायकवाड, नबी पटेल, राकेश खरारे, मनोज पवार, शेख मेहमूद, धनराज ठाकूर, लक्ष्मी खरे, गोकुळ बाविस्कर, अरुण साळुंखे, विनोद गायकवाड, आमिर पठाण, लोकेश वारके,विकास खडके, विक्की चव्हाण, लखन सोनवणे, अक्षय चव्हाण,सय्यद हाशिम, मोहसीन तडवी, विकास पाटील आदींनी दिला आहे.
