डेंग्यूत बळी गेलेल्यांच्या वारसांना भरपाईसाठी भुसावळात मोर्चा


भुसावळ : पालिकेने डेंग्यूमुळे बळी गेलेल्यांच्या परीवारास प्रत्येकी 20 लाख रुपये भरपाई द्यावी देण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी प्रभाग 18 मधील पंचशील नगरातील रहिवाशांनी गुरुवारी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे व मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्याशी चर्चा करू विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पालिका प्रशासन, नगराध्यक्षांसह आमदारांच्या नावाने मोर्चेकर्‍यांनी निर्दशने केली.

डेंग्यूतील बळी गेलेल्यांच्या कुटुंबास द्यावी भरपाई
शहरातील प्रभाग 18 मधील पंचशील नगरातील रहिवासी परवेज अहमद शे.पिंजारी या तरुणाचा डेंग्युमुळे मुंबई येथील केईएम हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असताना बळी गेला. यापूर्वीही शनीमंदिर वॉर्ड, गंगाराम प्लॉट, पासी वाडा, सिंधी कॉलनी आदी ठिकाणी डेंग्यूमुळे चार ते पाच जणांचे बळी गेले असून या सर्व मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 20 लाख रुपये भरपाई द्यावी, पंचशील नगर भागात दररोज पाणीपुरवठा करावा, घाणीचे साम्राज्य दूर करावे, शौचालय गटारींची दुरुस्ती करून परीसर स्वच्छ ठेवण्यात यावा, पंचशील नगर झोपडपट्टी भाग असल्याने तेथील नागरीकांची घरपट्टी माफ करण्यात यावी आदी मागण्यांसाठी मुन्ना सोनवणे यांच्या नेतृत्वात प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पंचशील नगर भागातील रहिवासी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. पालिका प्रशासन, नगराध्यक्ष व आमदारांच्या विरोधात निदर्शने करीत मोर्चा शहरातील जामनेर रोड, तापी रोड, तहसील कार्यालय, जळगाव रोड या मार्गाने प्रांताधिकारी कार्यालयावर पोहोचला. मोर्चेकर्‍यांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, मुख्याधिकारी करुणा डहाळे व महिला वैद्यकिय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !