हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चौघे आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार
तपासावेळी पोलिसांच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न अंगाशी : देशभरात कारवाईचे स्वागत
हैदराबाद : 27 वर्षीय पशूवैद्यकीय डॉक्टरावर सामूहिक अत्याचार करून तिला जिवंत जाळल्याप्रकरणातील चौघा आरोपींनी पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाला. शुक्रवारी पहाटे घडलेल्या या घटनेनंतर हैदराबाद पोलिसांचे जनतेतून उत्स्फूर्त स्वागत होत आहे. हैदरबाद बलात्कार पीडितेचे जळालेल्या मृतदेहाचे फोटो पाहून संपूर्ण देश हादरला होता. याप्रकरणी सायबराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बलात्कार करून केली होती हत्या
पीडित शादनगर येथील आपल्या घरातून शम्शाबाद स्थित कोल्लूर गावातील एका पशु चिकित्सालयात (वेटरनरी रुग्णालय) नोकरीसाठी निघाली असताना पीडितीची स्कूटर शादनगर टोलनाक्याजवळ पंक्चर झाल्याने स्कूटर टोलनाक्याजवळ लावली आणि टॅक्सी करून ती पुढे ऑफिसला गेली. कामावरून परतत असताना पीडित स्कूटरजवळ आली तेव्हा बुधवारी सायंकाळी तिने बहिणीला कॉल करून स्कुटर रीपेअर करण्याबाबत माहिती दिली. बहिणीने टॅक्सी करून परत ये असं सांगितले, तेव्हा पीडितीने काही माणसं माझी मदत करायला तयार आहेत असं सांगितलं. थोड्यावेळाने कॉल करते असं सांगून पीडितीने फोन ठेवला आणि त्यानंतर तिचा फोन बंद पडला. तिचं बहिणीशी रात्री 9. 15 वाजताच्यादरम्यान शेवटचं बोलणं झालं होतं. दरम्यान, स्कूटरजवळ उभी असताना तिने तिच्या बहिणीला फोन केला होता. मी जिथे उभी आहे तिथे मला भीती वाटते आहे असं तिने बहिणीला सांगितलं होतं. या संभाषणानंतर तिचा फोन बंद झाला. शेवटी पीडितीच्या कुटुंबीयांनी शम्शाबाद पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर दुसर्या दिवशी गुरुवारी सकाळची सहा वाजता दुधवाल्याला जळालेला मृतदेह आढळून आला होता.

