उटखेडा अत्याचार प्रकरण : अपर पोलिस अधीक्षकांकडून पीडीतेची चौकशी
रावेर : तालुक्यातील उटखेडा येथील विवाहितेच्या विनयभंग व अत्याचार प्रकरणाचा गुंता 10 दिवस उलटल्यानंतरही सुटलेला नाही. पोलिसांची सर्व बाजूंनी चौकशी सुरू असून आरोपींपर्यंत पोहोचवण्यासाठी पोलिसांचा कसून शोध सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणातील फिर्यादी असलेल्या पीडीत महिलेची व त्यापूर्वी येणार्या अश्लील मेसेजविरुद्ध गुन्हा दाखल करणार्या फिर्यादी महिलेची अपर पोलिस अधीक्षिका भाग्यश्री नवटक्के यांनी शुक्रवारी दुपारी दीड तास चौकशी केली. यावेळी उप विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे उपस्थित होते. दरम्यान, भर दिवसा अनधिकृतपणे घरात घुसून विवाहितेचा विनयभंग व अत्याचार करणारी घटना पोलिसांसाठीही आव्हान ठरली आहे. या घटनेतील आरोपी 10 दिवस उलटूनही पोलिसांना गवसला नसल्याने विविध माध्यमातून आरोपीचा कसून शोध पोलिसांकडून सुरूच आहे. उटखेडा येथील ग्रामपंचायतीने गावाच्या मुख्य रस्त्यांवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्याचे डिव्हीआर मशीन पोलिसांनी तपासणीसाठी काढून आणले असून त्याद्वारे तपासणी सुरू आहे. या प्रकरणातील आरोपी लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी व्यक्त केला.

