भुसावळात पेट्रोल पंपावरील कारंजात करंट उतरल्याने भावंडाचा करुण अंत


राखुंडे कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर : मामाकडे चिमुकले आले असतानाच दुर्दैवी घटना : पेट्रोल पंप संचालकांविरुद्ध गुन्हा

भुसावळ : जामनेर रोडवरील तिरूपती पेट्रोल पंपावर असलेल्या कारंजात विद्युत करंट उतरल्याने खेळण्यासाठी आलेल्या दोघा भावंडाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात आली. दीपक शंकर राखुंडे (वय 12) व गणेश शंकर राखुंडे (वय 10) अशी मृत भावंडांची नावे आहेत. मुलांचा मृतदेह पाहताच मातेने फोडलेला टाहो मन हेलावणारा होता. दरम्यान, ही भावंडे भुसावळ येथील मामाकडे आली असतानाच ही दुर्घटना झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली. दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी पेट्रोल पंपाचे संचालक प्रीतम कार्डा व सोनू कार्डा यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात चिमुकल्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

कारंजात करंट उतरल्याने चिमुकल्यांचा मृत्यू
जामनेर रोडवरील तिरुपती पेट्रोल पंप प्रीतम कारडा यांनी चालवण्यास घेतला आहे. या पंपावर छोटेशा उद्यानात कारंजा बसवण्यात आला असून त्यात दोन फुटांइतक्या पाण्यात शनिवारी रात्री दीपक व गणेश ही भावंडे खेळत असताना त्यांना करंट बसला. सुरुवातीला एका भावाला करंट लागल्याने तो पाण्यात पडल्याने त्याला वाचण्यासाठी दुसरा गेला असता त्याचाही या घटनेत मृत्यू झाला तर दहा वर्षीय आरती नामक बालिका मात्र फेकले गेल्याने बचावल्याचे सांगण्यात आले.




मुलांना पाहताच मातेने फोडला टाहो
धुळ्यासतील रहिवासी असलेल्या राखुंडे कुटुंबातील सदस्य भुसावळातील इंदिरा नगरातील भुरा पहेलवान या आजोबांकडे आले होते. सुरुवातीला घटना घडताच पंपावरील वीजपुरवठा बंद करण्यात आल्यानंतर चिमुकल्याने स्थानिक दवाखान्यात व तेथून गोदावरी रुग्णालयात हलवण्यात आले. नगरसेवक पिंटू कोठारी यांनी या कामी सहकार्य केले. उपअधीक्षक गजानन राठोड व बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, घटनास्थळी मृत चिमुकल्यांची माता पोहोचताच तिने टाहो फोडला. यावेळी अनेकांना गहिवरून आले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !