श्री क्षेत्र मनुदेवी येथे पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी घेतले दर्शन
घटस्थापना उत्साहात : मानापुरीपासून बसद्वारे मंदिरापर्यंत जाण्याची सुविधा
Thousands of devotees visited Shri Kshetra Manudevi on the very first day यावल : श्री क्षेत्र मनुदेवी मंदिरावर सोमवारी घटस्थापना करीत शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. दोन वर्षांनी कोरोना ओसरल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आल्याने पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी दर्शन घेतले. सातपुडा निवासिनी आई मनुदेवी मंदिरात सोमवारी सकाळी यावलचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर व वर्षा राकेश मानगावकर या दाम्पत्याच्या हस्ते विधीवत शास्त्रोक्त पध्दतीने घटस्थापना करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शांताराम पाटील, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, सचिव नीळकंठ चौधरी, विश्वस्त सोपान वाणी, भास्कर पाटील, चिंधू महाजन, सुनील महाजन, भूषण चौधरी, योगेश पाटील, नितीन पाटील, सतीश पाटील, चंदन वाणी, ज्ञानेश्वर पाटील, महेंद्र पाटील, मंदिर व्यवस्थापक आर.के.पाटील यांची उपस्थिती होती. दगडू महाराज, नितीन पाटील, विश्वदीप पाटील, सुनील पाटील आदींनी परीश्रम घेतले.

मानापुरीपासून बस सुविधा
दरम्यान, श्री क्षेत्र सातपुडा निवासिनी आई मनुदेवी मंदिरावर थेट वाहन नेण्यास बंदी असून मानापुरी गावाजवळ पार्कींग व्यवस्था करण्यात आली आहे. येथून 10 रुपये प्रवास भाडे घेत यावल आगारातून बससेवा दिवसभर चालवण्यात येत आहे.

