Dhule Car Driver’s Murder : Four Accused From Rajasthan In Dhule City Police Net  धुळ्यातील कार चालकाचा खून : राजस्थानातून चौघे आरोपी धुळे शहर पोलिसांच्या जाळ्यात


Dhule Car Driver’s Murder : Four Accused From Rajasthan In Dhule City Police Net
धुळे :
धुळे शहर पोलिसांनी शहरातील कार चालकाचा खून करून वाहन पळवणार्‍या आरोपींच्या राजस्थानमधून स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुसक्या आवळल्या आहेत. धुळ्यातील चित्तोड रोडवरील खासगी वाहनचालक दीपक विष्णू दाभाडे (42, कैलास नगर, धुळे) यांचा खून करून आरोपी राजस्थानमधील सरदार शहरात लपून असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने आरोपींना अटक केली आहे.

या आरोपींना केली अटक
जगतसिंग उर्फ सोढी जगीरसिंग शेरगीर (36, उधोगढ खुर्द, तहसील बाबा बकाला, जिल्हा अमृतसर, पंजाब), सूर्यप्रकाश जयप्रकाश पांडे (23, रा.लमकना दुबेपुर, कुडेमार जि.सुलतानपूर), ओमप्रकाश महावीर प्रसाद मेहरीया (24, रा. गांगीयासर, बिसाऊ, ता.मलसीसर, जि.जुंजन, राजस्थान) व आशिश ओमप्रकाश यादव (23, धर्मवली, लोटन, जि.सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींनी यापूर्वी दोन खून केल्याची कबुली दिली असून त्याबाबत गुन्हादेखील दाखल आहे तर आरोपींकडून गावठी कट्टादेखील जप्त करण्यात आला आहे.

धुळ्यातील कार चालकाचा खून करून मृतदेह फेकला
धुळ्यातील सुयोग लॉजमध्ये संशयीत जगताप जागीर व सूर्यप्रकाश पांण्डेय हे थांबल्यानंतर त्यांनी बर्‍हाणपूर जाण्यासाठी दीपक दाभाडे याची चारचाकी (एम.एच.18 बी.सी.5967) बुक केली होती. दोन्ही आरोपींसह अन्य दोघांनी बर्‍हाणपूर जिल्ह्यातील शिकारपूरापर्यंत 29 ऑगस्ट 2022 रोजी प्रवासदेखील केला मात्र मध्यप्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील शिकारपूर हद्दीत हत्या चालक दीपक दाभाडे याची हत्या करून आरोपींनी चारचाकीसह दोन मोबाईल आणि सोन्याची चार ग्रॅमची अंगठी, एटीएम कार्ड, गाडीचे कागदपत्र असा एकूण आठ लाख 18 हजारांचा मुद्देमाल लांबवला होता तसेच दीपकचा मृतदेह शिकारपुरा पोलिस स्टेशनच्या हद्दीतून फेकून पळ काढला होता. या प्रकरणी मयत दीपक दाभाडे यांच्या पत्नी वनिता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सीसीटीव्हीवरून काढला माग : कारही जप्त
पोलिसांनी तपासादरम्यान टोल नाक्यावरील सीसीटीव्हीचा आधार घेत आरोपींचा माग काढला. धुळ्यातील कार राजस्थानमील चुरू जिल्ह्यातील सरदार शहरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर राजस्थान पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. राजस्थानच्या सरदार शहर पोलिसांनी आरोपींना आर्म अ‍ॅक्टमध्ये अटक केल्यानंतर धुळे शहर पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील कार जप्त करण्यात आली. दरम्यान, तसेच राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातील सुभाष नगर पोलिसात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल असल्याचेही तपासात उघड झाले आहे.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
धुळे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक दादासाहेब पाटील, दीपक धनवटे, दत्तात्रय उजे, हवालदार सतीश कोठावदे, राजेंद्र देवरे, विजय शिरसाठ, नाईक राहुल सोनवणे, गौरव देवरे, विजय जाधव, दीपक सैंदाणे, प्रसाद वाघ, विवेक साळुंखे, भावेश झिरे, चालक पवनकुमार परदेशी आदींनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.