वरणगावात 15 रोजी जिल्हास्तरीय केसरी कुस्ती निवड चाचणी
वरणगाव : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परीषदेच्या मान्यतेने जळगाव जिल्हास्तरीय केसरी कुस्तीची निवड चाचणी स्पर्धा रविवार, 15 रोजी सकाळी 11 वाजता महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणात होणार असल्याचे तालुका कुस्तीगीर संघातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परीषदेत सांगण्यात आले. वरणगाव हनुमान व्यायामशाळेत आयोजीत पत्रकार परीषदेत अध्यक्ष नामदेव मोरे, उपाध्यक्ष सुपडू सोनवणे, एकनाथ भोई, रामदास माळी, सरचिटणीस प्रशांत निकम, कुस्तीचे भिष्मपितामह गुलाबराव देशमुख, शेख इस्माईल, संजय बावस्कर, शकील शेख, दिलीप मराठे, इफ्तेखार मिर्जा आदी कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी उपस्थित होते .
वरणगाव मल्लांचे शहर -प्रशांत निकम
याप्रसंगी प्रशांत निकम यांनी सांगितले की , महाराष्ट्र केसरीसाठी जळगाव जिल्हास्तरीय चाचणी घेण्याची संधी वरणगावला प्रथमच प्राप्ती झाली आहे. वरणगाव शहर हे पूर्वीपासून मल्लांचे शहर म्हणून ओळखले जाते. येथील कुस्तीपटूंनी राष्ट्रीय स्तरापर्यंत कुस्तीत स्पधेत यश मिळवले आहे. वरणगाव येथे शनिवार, 14 रोजी तालुकास्तरीय निवड चाचणी होईल व रविवार, 15 रोजी जिल्हास्तरीय निवड चाचणी होईल. या निवड चाचणीचे उद्घाटन माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार गिरीष महाजन, जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष राजीव देशमुख यांच्याहस्ते होणार आहे. आखाडा पूजन आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष सुनील काळे, चंद्रकात बढे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक यांच्या हस्ते होईल.
राज्यस्तरावरील पंच पाहणार काम
या निवड चाचणीसाठी कुमार गट, प्रौढ गट तसेच मुलींसाठी सुध्दा स्पर्धा होणार आहे. यात माती गट व गादी गट असे वेगवेगळे कुस्ती फड असतील तसेच कुस्ती चाचणीचे पंच म्हणून राज्य स्तरावरील पंच काम करतील. निवड चाचणी स्पर्धेसाठी जिल्हाभरातील कुस्तीप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन तालुका कुस्तीगीर समिती पदाधिकार्यांनी केले आहे. सूत्रसंचालन नामदेव मोरे तर आभार महेश सोनवणे यांनी मानले.

