भुसावळात रीपाइंच्या महामेळाव्यासाठी जय्यत तयारीला वेग


भुसावळ : शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर (डी.एस.ग्राऊंड) रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त पुढील महिन्याच्या सोमवार, 3 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजता महामेळावा होत आहे. या मेळाव्याच्या तयारीला वेग आला असून डी.एस.ग्राऊंडवर भव्य शामियाना (मंडप) उभारणीस वेग आला आहे. रीपाइं जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी हे मेळाव्याचे यशस्वी नियोजन करीत असून त्यांनी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, लक्ष्मण जाधव यांच्यासह गुरुवारी मेळावा स्थळाची पदाधिकार्‍यांसोबत पाहणी केली.

मैदान सपाटीकरणासह सफाईला वेग
महामेळाव्याच्या अनुषंगाने जेसीबीद्वारे मैदान सपाटीकरणाला गुरुवारपासून सुरूवात करण्यात आली आहे तसेच मैदानावरील गवतदेखील काढण्यात येत असून मैदान स्वच्छ झाल्यानंतर भव्य मंडपाची उभारणी केली जाणार आहे. मेळाव्यास्थळी मान्यवरांच्या व्यासपीठासह पत्रकार, कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करण्यात येणार असून पार्किंगसाठी देखील प्रशस्त व्यवस्था करण्यात येत आहे.

भीमगीतांचा कार्यक्रम होणार
महामेळाव्याप्रसंगी सिने गायक राजू बागूल व सिने गायिका सुहासिनी शिंदे यांचा भीम गीतांचा जंगी सामना होणार असल्याची माहिती रीपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी दिली.

महामेळाव्यासाठी राज्यातून 15 हजार कार्यकर्ते येणार
रीपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी म्हणाले की, या मेळाव्यासाठी राज्यभरातून तब्बल 15 हजार पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्या दृष्टीने आमचे नियोजन सुरू आहे. दरम्यान, या महामेळाव्यास आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे आदींसह भाजप, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.