अनधिकृत विक्रेत्यांची दबंगगिरी : तिघांवर हल्ला
पुष्पकसह मंगला एक्स्प्रेसमधील विक्रेत्यांवर अनधिकृत विक्रेत्यांनी ब्लेडने हल्ला चढवल्याने खळबळ
भुसावळ : पुष्पक एक्स्प्रेसच्या पँण्ट्रीकारमधील विक्रेत्यांवर अवैध विक्रेत्यांनी ब्लेडने हल्ला करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच रात्री पुन्हा मंगला एक्स्प्रेसमध्येदेखील घटनेची पुनरावृत्ती झाल्याने अधिकृत विक्रेत्यांमध्ये भीती पसरली आहे. रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिस यंत्रणेचे अवैध विक्रेत्यांशी असलेल्या लागेबांध्यामुळेच त्यांची हिंमत दिवसागणिक वाढत असून चार महिन्यात त्यामुळेच दुसर्यांदा ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. सर्वसामान्य प्रवाशांनी नियम मोडल्यानंतर कारवाईचा दंडुका उगारणारी रेल्वे सुरक्षा बलाची यंत्रणा मात्र गाड्यांमधील अनधिकृत विक्रेत्यांचा बंदोबस्त करण्यात सपशेल अपयशी ठरल्याने डीआरएम प्रशासनाने आता दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, हल्ल्यानंतर सुस्तावलेल्या रेल्वे सुरक्षा बल यंत्रणेला जाग आली असून त्यांनी अवैध विक्रेत्यांविरुद्ध धरपकड मोहिम सुरू केली असलीतरी कारवाईत सातत्य राखण्याची गरज व्यक्त होत आहे.
एकाच दिवशी दोन हल्ल्याच्या घटना
मुंबई येथून सुटलेली डाऊन पुष्पक एक्स्प्रेस बुधवारी दुपारी 3.30 वाजता भुसावळ स्थानकावरून सुटल्यानंतर अवैधरीत्या खाद्यपदार्थ विकणार्या विक्रेत्यांनी गाडीतील पेन्ट्रीकारमधील कर्मचारी विमलेश ठाकूर व चेतराम ठाकूर यांच्या चेहर्यावर ब्लेडने वार केल्याने दोन्ही विक्रेते जखमी झाले होते तर अवैध विक्रेत्यांनी गाडीची धोक्याची साखळी ओढून पळ काढला होता तर जखमींवर खंडव्यात उपचार करण्यात आले व खंडवा लोहमार्ग पोलिसात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, ही घटना ताजी असतानाच नाशिककडून येणार्या डाऊन मंगला एक्स्प्रेसमध्ये सुध्दा अवैध विक्रेत्यांने भुसावळ स्थानक येण्यापूर्वी आऊटरला गाडी थांबली असतांना अधिकृत विक्रेता विजय तोमर (27) यांच्या चेहर्यावर अणकूचीदार वस्तूने हल्ला करीत पळ काढला. या घटनेनंतर भुसावळ स्थानकावर जखमी विक्रेत्यावर उपचार करण्यात आले.

