यावलमध्ये पल्लवी चौधरींनाच सभापती पदाची मिळणार संधी !
पंचायत समिती भाजपाकडे राहणार : उपसभापतीपदासाठी रस्सीखेच
यावल : यावल पंचायत समितीच्या सभापती पदासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यता ओबीसी महिला प्रवर्गातील राखीव पदासाठी आरक्षण निघाल्याने विद्यमान सभापती पल्लवी पुरुजीत चौधरी यांनाच पुन्हा या जागेवर संधी मिळणार असल्याची दाट शक्यता असून पुन्हा भारतीय जनता पक्षाची या ठिकाणी सत्ता राहील, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून वर्तवला जात आहे तर उपसभापतीपदासाठी मात्र पुन्हा काँग्रेस व भाजपमध्ये रस्सीखेच होणार आहे.
उपसभापती पदासाठी होणार रस्सीखेच
पंचायत समितीच्या निवडणुकीवेळी जनरल ओबीसी महिला आरक्षित पद निघाले होते. त्यावेळी काँग्रेस व भाजपाकडे समसमान मते होती. त्यावेळी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या संध्या किशोर महाजन यांनी सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज तत्कालीन सभापती पदाच्या उमेदवार पल्लवी चौधरी यांच्याविरोधात बंड पुकारल्यानंतर काँग्रेसच्या पाठिंब्यावर आणि ईश्वरचिठ्ठीने भाजपा उमेदवार पल्लवी चौधरी यांचा पराभव करून संध्या किशोर महाजन यांनी भाजपाचा व्हिप झुगारत सभापतीपद मिळवले होत. त्यावेळी भाजपातर्फे उच्च न्यायालयात दाद मागितल्यामुळे संध्या महाजन यांना चार ते पाच महिन्यात अपात्र ठरविण्यात आले होते. रीक्त जागेवर पल्लवी चौधरी यांनी सभापती पदाचा पदभार निवडणुकीत स्वीकारला होता. त्या दिवसापासून संध्या किशोर महाजन या दहिगाव गणातून अपात्र झाल्याने जागा रीक्त आहे याबाबत उच्च न्यायालयात निकाल अद्याप आलेला नाही तर लताबाई भगवान कोळी या सांगवी खुर्द पंचायत समितीत गणातून एस.टी.महिला या जागेवरून निवडून आलेल्या होत्या मात्र त्यांना निवडणुकीनंतर सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्या गेल्याने याबाबत पंचायत समिती काँग्रेस गटनेता शेखर सोपान पाटील यांच्या तक्रारीनुसार अपात्र घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेस व भाजपाकडे समसमान आज चार चार सदस्य आहेत. आता आरक्षण महिला ओबीसी राखीव प्रवर्गातील निघाल्याने भाजपाच्या गटात पल्लवी चौधरी याच उमेदवार असल्याने त्यांचा आता सभापतीपदाच्या पुढील कार्य काळ हा अबाधितच राहणार आहे मात्र काँग्रेसच्या पारड्यात गेलेल्या उपसभापतीपदी उमाकांत रामराव पाटील यांच्या जागेवर आता निवडणूक झाल्यास पुन्हा भाजप आणि काँग्रेसमध्ये उपसभापती पदासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता येणार्या कालखंडात येत्या आठ दिवसात आणखी काय खेळी केली जाते ? याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.


