भुसावळ अग्निशमन दल केंद्राची दुरवस्था थांबवावी
शिवसेना पदाधिकार्यांची मागणी : आनंद नगरातील पूर्ववत केंद्र हवे
भुसावळ- शहरातील आनंद नगर परीसरातील अग्निशमन केंद्र आता तापी नगर, यावल रोड परीसरात हलवण्यात आले आहे. वरणगांव रोड, जामनेर रोड, खडका रोड, वांजोळा रोड, आठवडे बाजार परिसरात आग लागल्यास त्या ठिकाणी वाहन पोहोचेपर्यंत मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. जळगांव रोड मार्गे घटनेच्या ठिकाणी दलाची गाडी पोहोचत असल्याने दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
केंद्राची दैनावस्था थांबवावी
काही वर्षांपूर्वी अग्निशमन केंद्रासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. त्यानंतर अग्निशामक गाडीची खरेदीही झाली. या केंद्रांमध्ये कार्यालय, कर्मचार्यासाठी विश्रामगृह, 24 तास पाणी उपलब्ध करून देणार्या पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. या विभागासाठी कुशल कर्मचार्याची भरती झाली. सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या असतानाही अग्निशमन केंद्रांची दैन्यावस्था झाली आहे. परीसराला अस्वच्छतेचा विळखा पडला आहे. भुसावळ शहरातील शिवसैनिकांनी शुक्रवार, 13 डिसेंबर रोजी येथे भेट दिली. या ठिकाणी अग्निशमन केंद्र पुन्हा सुरू झाल्यास शहराच्या कुठल्याही भागात आग लागली तर त्या-त्या कार्यालयाशी संपर्क साधून त्या ठिकाणी पोहोचणे शक्य होईल व मोठे नुकसान टाळता येईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली. शहरातील आग आटोक्यात आणण्याबरोबरच पाणी वाटपाचंही काम या दलाच्या वाहनमार्फत केले जाते. भुसावळ नगरपालिका सभेत केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव घेण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख बबलू बर्हाटे यांनी मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्याशी संपर्क साधून केली आहे. भुसावळ मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी त्वरित एक गाडी दुरुस्त करून आनंद नगर भागातून सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. शहरातील सर्व आपात्कालीन मदत केंद्राची परीस्थिती सुधारावी, कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी भविष्यात शिवसेनेतर्फे आंदोलने केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. शिवसेना शहर प्रमुख बबलू बर्हाटे, उपशहरप्रमुख पवन नाले, अमोल कोळंबे, हर्षल चौधरी, तेजस तिवारी, बाळा ढाके हे आनंद नगर अग्निशमन दल कार्यालयात उपस्थित होते.

