भुसावळ रेल्वे स्थानकावरील फुड प्लाझात सिलिंडर पेटले : अनर्थ टळला


भुसावळ : गॅस सिलिंडरने पेट घेतल्यानंतर फुड प्लाझाच्या स्वयंपाक कक्षाला आग लागल्याने यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर रेल्वेतील विविध विभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, आगीचे नेमके कारण कळण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून केएमए फूड प्लाझामधील स्टोअर रूम सील करण्यात आला आहे.

तत्काळ आग विझल्याने अनर्थ टळला
रेल्वे प्लॅटफार्म क्रमांक तीनवर केएमए फूड प्लाझामधील स्वयंपाक खोलीत सोमवारी दुपारी एक वाजता व्यावसायीक वापरासाठी असलेल्या सिलिंडर लिकेज झाल्यानंतर त्याने पेट घेताच आग लागली. यावेळी स्थानकावरील अधिकारी, कर्मचारी व विक्रेत्यांनी तत्काळ धाव घेत आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच स्थानक संचालक जी.आर.अय्यर, स्थानक व्यवस्थापक मनोज श्रीवास्तव, कार्यालय अधीक्षक मोहिनुद्दीन अन्सारी, आरपीएफ निरीक्षक दिनेश नायर, सुरेश थोरात, कॅन्टीन निरीक्षक शकील शेख, शैलेश पारे, किरण ठाकूर, विद्युत विभागाचे अशफाक खान, आरपीएफ उपनिरीक्षक लीना सिंग, योगेश घुले, मिलिंद टोके यांच्यासह विविध विभागाचे कर्मचारी व कॅन्टीनमधील कामगारांनी धाव घेत या खोलीत असलेले चार सिलेंडर तत्काळ बाहेर काढले. स्थानक संचालक, उपस्थानक व्यवस्थापक, फुड प्लाझा आदी ठिकाणांहून आणलेल्या सुमारे 14 अग्निशामक यंत्रांनी आग आटोक्यात आणली. घटनास्थळी काही वेळातच अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोज सिन्हा, वरीष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आर.के. शर्मा, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक बी.अरुण कुमार, सहाय्यक सुरक्षा आयुक्त राजीव दीक्षित आदी अधिकार्‍यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच सदर घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली.दरम्यान, सतत सुरू असलेल्या खाद्यपदार्थ निर्मितीच्या कामांमुळे सिलेंडर गरम होऊन पेट घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेमुळे काही वेळ प्रवाशांमध्येही घबराट पसरली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !