रावेरात अवैध वाळू वाहतूकदारांवर धडक कारवाईने खळबळ
रावेर : अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणार्या वाहनांवर महसूल प्रशासनातर्फे कारवाई केली जात असल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. महसूल पथकाने सोमवारी रावेर शहरातील कल्याणी हॉटेलनजीक कारवाई करीत वाळुने भरलेले ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. महसूल विभागाकडून ट्रॅक्टर-ट्रॉली (एम.एच.27 एल.9986) ला रावेर शहरातील कल्याणी हॉटेलजवळ रावेरच्या दिशेने येताना पकडण्यात आले. या कारवाईने तापी, सुकी, भोकर नद्यांना पोखरणार्या वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी प्रदीप आळे, मंडळाधिकारी सचिन पाटील, तलाठी डी.व्ही.कांबळे, तलाठी यासीन तडवी, तलाठी शैलेश झोटे, तलाठी निलेश पाटील, कोतवाल गणेश चौधरी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

