जळगावातील मानराज मोटर्समधून चार लाख लांबवले
जळगाव : शहरातील एमआयडीसी परीसरातील मानराज मोटर्स या वाहनाच्या शोरुममधून चोरट्यांनी चार लाखांची रोकड व मोबाईल लांबविल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरटे सीसीटीव्हीत कैद
सोमवारी पहाटे 2.10 वाजता तोंडाला रुमाल बांधलेले तसेच निळ्या रंगाची जिन्स व स्वेटर परीधान केलेल्या दोन चोरट्यांनी काचेचा दरवाजा उघडत शोरूम गाठून एकाने टॅमीने कॅशियर कांउटर तोडत त्यातील तीन लाख 99 हजार 385 रुपये रोख व शेजारच्या कांउटरमधील अडीच हजाराचा मोबाईल लांबवत चोरट्यांनी पळ काढला. शोरुमधील वर्कशॉप मॅनेजर दिनेश भगीरथ पाटील (42, रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. सहायक पोलिस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन, निरीक्षक रणजीत शिरसाठ, सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, हेमंत कळसकर, इम्रान सय्यद यांनी घटनास्थळाची पाहणी करुन सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले.



