वरणगावला राज्यपाल भगतसिंग कोशारींच्या प्रतिमेला मारले जोडे
बेताल वक्तव्याचा शिवसेनेतर्फे निषेध ः सुधांशू त्रिवेदीच्या प्रतिमेचेही केले दहन
वरणगाव : राज्यपाल भगतसिंग कोषारी व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याने त्याचा सोमवारी सकाळी दहा वाजता बस स्टँड चौकात शिवसेना (ठाकरे) पक्षातर्फे निषेध करण्यात आला. राज्यपाल कोशारींसह सुधांशु त्रिवेदी यांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिमा दहन करण्यात आले. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करुन पोलिस स्टेशनला सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार अडसूळ यांना निवेदन देण्यात आले.
राज्यपालांच्या बेताल वक्तव्याचा निषेध
निवेदनाचा आशय असा की, राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी मराठवाडा विद्यापीठ पदवी प्रदान सोहळ्यात बोलतांना छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील हिरो होते, आताच्या काळात गडकरी, फडणवीस हे हिरो आहे, असे वक्तव्य करुन तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या तसेच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी चारवेळा औरंगजेब यांची माफी मागितली, असे बेताल वक्तव्य केले. दोघांनी असे बोलून महाराष्ट्राची अस्मिता दुखावली असून कोशारी यांनी पूर्वीदेखील महात्मा फुले दाम्पत्यांबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. वारंवार बेताल वक्तव्य करणार्या राज्यपाल यांना राष्ट्रपती यांनी पदमुक्त करावे तसेच राज्यपाल कोशारी आणि सुधांशु त्रिवेदी यांनी त्वरित माफी मागावी अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.


यांची आंदोलन प्रसंगी उपस्थिती
यावेळी जिल्हाप्रमुख समाधान महाजन, विलास मुळे, तालुका उपप्रमुख सुभाष चौधरी, वरणगाव शहरप्रमुख संतोष माळी, अल्पसंख्यांक संघटक सईद शेख, जिल्हा युवासेना अधिकारी चंद्रकांत शर्मा, उप शहरप्रमुख सुखदेव धनगर, अशोक शर्मा, संजू कोळी, आबा सोनार, उपसरपंच उल्हास भारसके, प्रकाश कोळी, भुरा धरणे, प्रल्हाद माळी, इरफान खान, विक्की मोरे, राजेश महाजन, प्रवीण बकोळे, संजय खाराते, मोहन धनगर, शिवा भोई, किरणं माळी, राम शेटे, निलेश काळे, उमाकांत झांबरे, बाळू माळी, यशवंत बढे यांच्यासह शिवसैनिक मोठया संखेने उपस्थित होते.