राज्यपाल कोशारींसह सुधांशू त्रिवेदींचा ठिकठिकाणी निषेध
आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध : राज्यपाल कोश्यारींची पदावरून हकालपट्टी करण्याची निवेदनाद्वारे मागणी
Sudhanshu Trivedi protested everywhere along with Governor Koshari मुक्ताईनगर : भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान करणार्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांचा मुक्ताईनगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निषेध करण्यात आला. भगतसिंग कोश्यारी यांची राज्यपाल पदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी तहसीलदार यांना निवेदन देवून करण्यात आली.
जनभावना दुखावल्या
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड भारत देशाचे आराध्य दैवत आहे. जोपर्यंत चंद्र सुर्य आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे संपूर्ण भारतवासीयांच्या हृदयात अढळ स्थान असून राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आक्षेपार्ह विधान करून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. वारंवार समाजात तेढ निर्माण करून शांतता भंग करणार्या भगतसिंग कोश्यारी यांची महाराष्ट्र राज्यातून हकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांनी केली. यावेळी राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, पवनराजे पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र माळी, युवक शहराध्यक्ष बबलू सापधरे, रवींद्र दांडगे, नंदकिशोर हिरोळे, रामभाऊ पाटील, चेतन राजपूत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.


यावलला अ.भा.छावा मराठा संघटनेकडून निषेध
यावल : यावल पोलिस ठाण्यात अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना तसेच छावा क्रांतीवीर सेना, यावल यांच्यावतीने निवेदन देवून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करून कोश्यानी यांनी मराठा समाजासह बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. यावल पोलिस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे यांना निवेदन देण्यात आले. अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना व छावा क्रांतिवीर सेना या दोन संघटनाच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदन देताना अ.भा.छावा मराठा संघटनेचे तालुकाध्यक्ष मनोज पांडुरंग साठे, छावा क्रांतीवीर सेना तालुकाध्यक्ष कौसर अली युनूस अली यांची उपस्थिती होती.