बीडच्या पोलिस कर्मचार्याची आत्महत्या : जळगावातील तरुणीला बेड्या
जळगाव : बीडमधील शिवाजी नगर पोलिस ठाण्यात कार्यरत कर्मचारी दिलीप प्रकाश केंद्रे (30) यांनी मंगळवारी धांडेनगरात सर्व्हिस रीव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीच्या आधारे बीड पोलिसांनी बुधवारी पिंप्राळा हुडको भागातून संशयीत आरोपी पूजा गुलाब पाटील हिला अटक केली.
आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
दिलीप केंद्रे हे जळगाव जिल्ह्यातून बीडमध्ये बदलून आले होते. ते मुळचे आंबेजोगाईचे असून त्यांनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धांडे नगर येथील एका लिंबाच्या झाडाखील स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. केंद्रे यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती व ती पोलिसांनी जप्त केली आहे. दिलीप केंद्रे यांच्या पत्नीने जळगावमधील एका तरुणीवर आरोप केल्याने तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या चिठ्ठीत जळगावातील पूजा गुलाब पाटील (33, रा. जळगाव) आणि तिचा जळगावातील पोलिस प्रियकराच्या नावाचा उल्लेख आहे. प्रेयसीच्या ब्लॅकमेलींगला कंटाळून पोलीस कॉन्स्टेबल दिलीप केंद्रे यांनी पिस्तूलाने डोक्याला गोळी झाडून आत्महत्या केल्याने केंद्रे यांच्या पत्नी अनिता यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पूजा गुलाब पाटील हिच्याविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. बुधवारी बीड येथील कॉन्स्टेबल कैलास ठोके, नाईक तुकाराम तांबारे, नाईक विजय घोडके, महिला पोलीस कर्मचारी सौदरमल विद्या आणि वैशाली इंचके जळगावातील रामानंद नगर पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी रामानंद नगर पोलीस कर्मचारी रवींद्र पाटील, संतोष गिते, उज्ज्वला पाटील यांच्या सहकार्याने आरोपी पूजा पाटीलला अटक केली.


