नवीन वर्षात महापालिकांच्या होणार निवडणुका ! : 24 महापालिकांमध्ये आता नव्याने होणार प्रभाग रचना
Municipal elections will be held in the new year! : Ward structure will be newly formed in 24 municipalities मुंबई : राज्याच्या नगरविकास विभागाने मंगळवारी राज्यातील 24 मनपा निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश काढल्याने नव्या वर्षात निवडणूक कार्यक्रम लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. त्यावर मंगळवार, 29 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असून त्यानंतरच निवडणुकांबाबत निर्णय होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
नवीन वर्षात होणार निवडणुका
ओबीसीचे राजकीय आरक्षण आणि बदललेल्या प्रभाग रचनेविरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर सुनावणी होणार असताना, मंगळवारी राज्याच्या नगरविकास विभागाने सार्वत्रिक निवडणुकीसाठी महानगरपालिकांच्या प्रभागांची संख्या आणि प्रभाग रचनेचा प्रारूप तातडीने बनविण्याच्या सूचना राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या आयुक्तांना दिल्या. त्यामुळे नवीन वर्षात महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मुदत संपलेल्या व नजीकच्या कालावधीत मुदत संपत असलेल्या मनपाच्या निवडणुकीसाठी सन 2011च्या जनगणनेनुसार प्रभागांची संख्या व रचना निश्चित करून प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात यावी, अशा सूचना नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत.

