रावेर तहसीलला अतिवृष्टिचे 12 कोटी 84 लाखाचे अनुदान प्राप्त
खाते क्रमांक शेतकर्यांनी तलाठ्यांकडे देण्याचे आवाहन
रावेर : अतिवृष्टीमुळे तालुक्यात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकर्यांना नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून सुमारे 12 कोटी 84 लाख रुपयांचे अनुदान रावेर तहसील कार्यालयाला प्राप्त झाले आहे. यावर्षी तालुक्यात अति वृष्टीमुळे कपाशी, मका, ज्वारी, सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शासनाकडून नुकसाग्रस्त शेतक-यांना आठ हजार रुपये हेक्टरप्रमाणे मदत करण्यात येत आहे. एका शेतक-याला जास्तीत-जास्त दोन हेक्टरपर्यंत मदत शासनाकडून मिळणार आहे. यापूर्वी पहिला हप्ता म्हणून 10 हजार 364 शेतकर्यांना सात कोटी 40 लाख 29 हजार रुपयांची हेक्टरप्रमाणे मदत करण्यात आली. दुसरा हप्ता 12 कोटी 84 लाखांचा प्राप्त झाला असून त्यापैकी सात हजार 887 शेतकर्यांना सहा कोटी 64 लाखांची मदत करण्यात येणार आहे.
तलाठ्याकडे खाते नंबर देण्याबाबत आवाहन
तालुक्यात अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी ज्या शेतकर्यांनी अद्याप आपले खाते क्रमांक तलाठ्यांकडे दिले नसतील अशा शेतकर्यांनी संबंधित गावातील तलाठ्यांकडे आपले क्रमांक द्यावे तसेच शेतकर्यांच्या खात्यावर अतिवृष्टीची मदत रक्कम वर्ग करण्याचे काम आमच्या महसूल विभागाकडून सुरू झाल्याचे नायब तहसीलदार संजय तायडे यांनी सांगितले.

