भुसावळात 15 बैलांची सुटका ; दोन स्वतंत्र कारवाईत तिघांविरुद्ध गुन्हा
भुसावळ : कत्तलीच्या इराद्याने भुसावळात गुरे आणल्याप्रकरणी अनोळखीविरुद्ध तर दुसर्या कारवाईत निर्दयपणे बैलांची वाहतूक केल्याप्रकरणी सावद्याच्या दोघांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही कारवाईत पोलिसांनी 15 बैलांची सुटका केली.
सावद्याच्या दोघांविरुद्ध गुन्हा
नाहाटा चौफुलीवर रविवारी रात्री 8.30 वाजता एका वाहनात (क्रमांक एम.एच.19 एस. 3874) मधून तीन बैलांची वाहतूक होत असताना पोलिसांनी वाहतूक परवाना आणि कागदपत्रांची मागणी केली असता संबंधिताकडे ती आढळली नाहीत. पोलिसांनी तिन्ही बैल ताब्यात घेत त्यांची जळगावच्या पांझरपोळ येथे रवानगी केली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी सचिन पोळ यांच्या फिर्यादीवरून शेख जुबेर शेख मतीन व शेख मोहसीन शेख राजा यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जयराम खोडपे पुढील तपास करीत आहे.
भुसावळात 12 बैलांची सुटका
भुसावळ- शहरातील मिल्लत नगर भागात रविवारी रात्री बाजारपेठ पोलिसांनी बेवारसस्थितीत बांधलेल्या 12 बैलांची सुटका केली होती. शोध घेवूनही आरोपी न मिळाल्याने या 12 बैलांची जळगावच्या पांझरपोळला रवानगी करण्यात आली. बाजारपेठ पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय गुळींग यांच्या फिर्यादीवरून अनोळखी व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.