खामगावात दोघा तरुणांची चाकूने भोसकून हत्या
खामगाव : शहरातील दोन तरुणांची चाकूने भोसकून व दगडाने ठेवून हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडल्याने खळबळ उडाली आहे. विशाल देशमुख (32) व सचिन पवार (33) अशी हत्या झालेल्या युवकांची नावे आहेत. रात्री दोन वाजताच्या सुमारास दोन्ही युवकांचे मृतदेह शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील घाटपुरी नाका भागात रक्ताच्या थारोळ्यात आढळल्यानंतर शहरात खळबळ उडाली. तरुणांच्या हत्येचे अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी धाव घेतली. स्थळ निरीक्षण व पंचनाम्यानंतर दोन्ही युवकाचे मृतदेह शवविच्छेदनासाठी खामगाव उपजिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. दरम्यान घटनेचे गांभीर्य पाहून जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ खामगाव येथे दाखल झाले आहेत.
