मातृ-पितृंच्या स्मरणार्थ शिंदीतील जिल्हा परीषद शाळेत बांधला ‘रंगमंच ओटा’
सावित्रींच्या लेकींनी फेडले शाळेचे पांग ः प्रत्येक मूल शिकायलाच हवे ः प्राचार्य डॉ.अनिल झोपे
भुसावळ : तालुक्यातील शिंदी येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत प्रेरणा सभा आणि सावित्रीबाई फुले रंगमंच ओटा उद्घाटन सोहळा नुकताच झाल. उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉ.अनिल झोपे होते. लोकसहभाग कसा मिळवावा ते शिंदी शाळेतील आदर्श शिक्षक समाधान जाधव यांच्याकडून शिकावे, त्यांनी शाळेत मिळविलेल्या लोकसहभागाबद्दल मुख्याध्यापक आणि सर्व उपशिक्षकांचे कौतुक केले. शाळेसाठी लागणार्या भौतीक सुविधा शाळा डिजिटल करण्यासाठी आवश्यक साहित्य गावांमधून लोक सहभागातून मिळवलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शाळेत येणार प्रत्येक मूल शिकल पाहिजे, असे आवाहनही प्राचार्य डॉ.झोपे यांनी केले.
लोकसहभाग अत्यंत गरजेचा : किशोर वायकोळे
प्रेरणा सभेचे मार्गदर्शक गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी शाळेतील माजी विद्यार्थी ज्यांनी शाळेमध्ये शिक्षण घेऊन आज मोठ्या पदावर कार्यरत असतील, नोकरीला असतील तसेच उच्च प्रतिष्ठित गावकरी, ग्रामस्थ यांनी शाळेला लोकसहभाग दिला पाहिजे आणि शिंदी शाळेसारखी शाळा सर्व भुसावळ तालुक्यातील ग्रामस्थांनी, शिक्षकांनी करावी, असे आवाहन शिक्षकांना केले.

गावकर्यांचे शाळेचे भावनिक नाते : शैलेश पाटील
कार्यक्रमाचे मार्गदर्शक अधिव्याख्याता, डायट जळगाव शैलेश पाटील यांनी शिंदी गावातील गावकर्यांचं भावनिक नातं शाळेशी जुळलेले आहे. या भावनिक नात्यामुळे सर्व माजी विद्यार्थी, गावकरी शाळेला मोठ्या प्रमाणात लोक सहभाग देत आहेत. त्याबद्दल त्यांनीही त्यांचे गावकर्यांचे, शिक्षकांचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देणार : दिलीप सूर्यवंशी
कार्यक्रमाचे मार्गदर्शक सेवानिवृत्त डीवायएसपी दिलीप सूर्यवंशी (मुंबई) यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मी माझ्या सेवानिवृत्तीचे 40 लाख रुपये माझ्या दुसखेडा गावासाठी खर्च केलेले आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांना शाळेत नेण्यासाठी स्कूल बस, आजारी लोकांना दवाखान्यात नेण्यासाठी रुग्णवाहिका, सामाजिक कार्यासाठी प्रशस्त हॉल, सुसज्ज वाचनालय अशा अनेक गोष्टी केल्या आहे आणि त्याचप्रमाणे शिंदी शाळेतील शिक्षकांनी सुद्धा लोकसहभागातून शाळा अतिशय आकर्षक केली आहे त्यामुळे ते प्रभावित प्रभावित होऊन पुढील शैक्षणिक वर्षांमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना उच्च दर्जाची स्कूल बॅग भेट देण्याचे जाहीर केले.
आई-वडिलांच्या स्मरणार्थ बांधला ओटा
बहिणाई देवराम सपकाळे यांच्या स्मरणार्थ ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले रंगमंचाचे उद्घाटन फित कापून प्राचार्य डॉ.अनिल झोपे यांनी केले. हा रंगमंच शिंदी शाळेतील माजी विद्यार्थिनी व सेवानिवृत्त पदवीधर शिक्षिका लीला सपकाळे (जळगाव), सेवानिवृत्त नायब तहसीलदार कमल सपकाळे (जळगाव), सेवानिवृत्त उपकोषाधिकारी विमल सपकाळे (जळगाव) या तिन्ही बहिणींनी शाळेच्या माजी विद्यार्थिनी म्हणून आणि आपल्या आई-वडिलांचे कायम स्मरण राहावे म्हणून त्यांच्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ शाळेला रंगमंच ओटा बांधून दिला. त्याबद्दल तिन्ही बहिणींचे सर्व अधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक यांनी खूप कौतुक केले, अभिनंदन करीत त्यांचे आभार मानले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
अध्यक्षस्थानी शिंदी गावाचे उपसरपंच कैलास पाटील उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, अधिव्याख्याता शैलेश पाटील, अधिव्याख्याता डॉ.चंद्रकांत साळुंखे, शिक्षण विस्तार अधिकारी, तुषार प्रधान, किन्ही, दीपनगर, कुर्हे येथील केंद्रप्रमुख कमलाकर चौधरी उपस्थित होते .प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक योगेश इंगळे, सुनील वानखेडे, जीवन महाजन, खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी भूषण झोपे, राहुल भारंबे, दिनेश पाटील आदींची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक भगवान बडगुजर, उपशिक्षक समाधान जाधव, मीनाक्षी पाटील, प्रीती फेगडे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, बन्सीलाल पाटील, कांचन परदेशी, जगदीश पाटील, ललित राजपूत यांनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन आदर्श शिक्षक समाधान जाधव तर आभार प्रदर्शन बन्सीलाल पाटील यांनी मानले.