जिल्हा बँक संचालिका जनाबाई महाजन अपात्र : सहकार क्षेत्रात खळबळ
District Bank Manager Janabai Mahajan disqualified : Excitement in cooperative sector रावेर : जळगाव जिल्हा बँकेच्या संचालिका जनाबाई गोंडू महाजन अपात्र ठरल्याने रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. महाजन यांना पुढील तीन वर्ष कोणत्याही सहकारी संस्थेत निवडणूका लढवण्यास बंदी केल्याचे आदेश नाशिक येथील विभागीय सहनिबंधक विलास गावडे यांनी दिला आहे. याबाबतची माहिती माजी आमदार अरुण पाटील यांचे पूतणे मंदार पाटील यांनी रावेरात पत्रकार परीषदेत दिली.
चुरशीच्या लढाईत महाजन यांचा पराभव
गेल्या वर्षाच्या अखेरीस अर्थात २१ नोव्हेंबर २०२१ रोजी झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रावेर सोसायटी मतदारसंघातून धक्कादायक निकाल लागला होता. माजी आमदार अरुण पांडुरंग पाटील यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने आमदार एकनाथराव खडसे यांच्या पॅनलतर्फे ऐन वेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गोंडू महाजन यांच्या पत्नी जनाबाई गोंडू महाजन यांना उमेदवारी देण्यात आली होती. प्रतिस्पर्धी जनाबाई महाजन व राजीव पाटील या दोघे उमेदवारांनी माजी आमदार अरुण पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला होता परंतु जनाबाई महाजन यांनी राजकीय खेळी करत ही लढत चुरशीची केली. यात अरुण पाटील यांचा अवघ्या एक मताने पराभव करून जनाबाई महाजन या विजयी झाल्या होत्या.

निवडणूक खर्च न दिल्याने अपात्र
नियमानुसार निकाल लागल्यापासून ६० दिवसांच्या आत निवडणुकीचा खर्च दाखविणे आवश्यक होते. तथापि अंतीम मुदत उलटून गेल्यानंतर देखील त्यांनी खर्चाचे विवरण दाखल केले नव्हते. या संदर्भात माजी आमदार अरुण पाटील यांचे पुतणे मंदार पाटील यांनी माहितीच्या अधिकारात मिळालेली माहिती घेऊन यांनी सहकार खात्याकडे दाद मागितली होती. या अनुषंगाने जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था विलास गावडे यांनी जनाबाई गोंडू महाजन यांना अपात्र ठरविले आहे तसेच पुढील तीन वर्ष कोणत्याही सहकार संस्थेत निवडणूक लढवण्यावर बंदी घातली आहे. या बाबतची माहिती शनिवारी मंदार पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली. यावेळी पत्रकार परीषदेला राष्ट्रवादी कॉग्रेस तालुका अध्यक्ष नीळकंठ चौधरी, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ.राजेंद्र पाटील, सूर्यभान चौधरी, काँगे्रस शहराध्यक्ष संतोष पाटील, नितीन पाटील उपस्थित होते.
खोटी बिले केली सादर
विरोधकांनी वर्तमान पत्रात जाहीर पाठींबा दिल्याच्या जाहिरातीची खोटी बिले सादर केली आहे. आम्ही जिल्हा बँक निवडणुकीत झालेला योग्य तो खर्च सादर केला आहे. विरोधकांनी कितीही उड्या मारल्या तरी पाच वर्ष मीच संचालक राहाणार आहे. जिल्हा बँक संचालक अपात्रतेच्या सहनिबंधकांच्या आदेशाविरुद्ध औरंगाबाद उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे अपात्र संचालिका जनाबाई गोंडू महाजन म्हणाल्या.