यावल तहसीलचे कामकाज आता चालणार प्रशासकीय इमारतीतून
सोमवारपासून प्रत्यक्षात कामकाजाला होणार सुरुवात : कुंपण बांधण्याची मागणी
यावल : सातोद-कोळवद या मार्गावरील सुसज्य अशा नव्याने बांधण्यात आलेल्या तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय ईमारतीत शनिवारी तहसील विभागाने औपचारीकरीत्या पूजा-अर्चा करीत दप्तर हलवले आहे. असे असलेतरी प्रत्यक्षात सोमवारपासून प्रत्यक्षात सोमवारपासून कामकाजाला प्रारंभ होणार आहे. सुमारे तीन कोटी खर्चाने उभारण्यात आलेल्या प्रशासकीय ईमारतीच्या प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी आमदार शिरीष चौधरी यांनी मागील सहा वर्षांपूर्वीच पाठपुरावा करून प्रशासकीय मंजुरी मिळवली होती. या इमारतीचे बांधकाम पूर्णत्वाकडे घेवून जाण्यासाठी माजी आमदार हरीभाऊ जावळे यांनीही महत्वाची भूमिका बजावली होती.
पाच वर्षानंतर काम झाले पूर्ण
पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर प्रशासकीय ईमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अखेर तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी शनिवारी शहरातील सुमारे शंभर वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या ब्रिटीशकालीन तहसीलच्या ईमारतीतून आपले संपूर्ण कार्यालय सातोद-कोळवद मार्गावरील नवीन प्रशासकीय ईमारतीत हलवले. शनिवारी सकाळी 10 वाजता निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून नव्या प्रशासकीय ईमारतीत प्रवेश करण्यात आला. याप्रसंगी महसुलचे सर्व अधिकारी व कर्मचारी हे प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रशासकीय ईमारतीच्या कार्यालयास संरक्षण भिंत नसल्याने महसुली कामकाजासाठी येणार्या नागरीकांसाठी गैरसोय व अडचणी निर्माण होण्याची ही शक्यता काही जाणकारांकडुन व्यक्त होत आहे. दरम्यान, शासनाने तत्काळ या प्रशासकीय ईमारतीला संरक्षण भिंत बांधावी, अशी मागणी होत आहे.

