दुसर्या दिवशीही संपाचा फटका : भुसावळ विभागात शासकीय कार्यालयांमध्ये कामकाज ठप्पच
पेन्शन योजना लागू करण्यावर कर्मचारी ठाम : शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती घटली
The impact of the strike on the second day also: In Bhusawal division, the work in the government offices remained at a standstill भुसावळ : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, आरोग्य व नगरपालिका कर्मचार्यांनी राज्यभरात बेमुदत संपाची हाक दिली आहे. 48 तासानंतरही संपावर तोडगा न निघाल्याने शहरासह भुसावळ विभागातील शासकीय कार्यालयांमध्ये कामकाज ठप्प झाले आहे तर शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या घटली असून आरोग्य यंत्रणेवरही त्याचा परीणाम झाल्याने रुग्णांचे मोठे हाल होत आहेत.
भुसावळात त्रिस्तरीय समिती शासन निर्णयाची होळी
भुसावळ : तालुक्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामसेवक, पंचायत समिती, आरोग्य व महसूल विभागातील कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी मंगळवारपासून संपावर गेले आहे. बुधवारी दुसर्या दिवशी देखील कर्मचार्यांचा संप सुरू होता. संपात सहभागी विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजता कर्मचार्यांनी पंचायत समिती कार्यालय परिसरात एकत्र येत आंदोलन केले. अन्यायकारक त्रिस्तरीय समिती शासन निर्णयाची होळी करण्यात आली. ’एकच मिशन… जुनी पेन्शन’, ’पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
प्रांताधिकार्यांना निवेदन
संपात सहभागी कर्मचार्यांनी पंचायत समिती ते प्रांत कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. त्यानंतर प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. नवीन पेन्शन योजना रद्द होऊन जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. निवेदनात जुन्या पेन्शन मागणी सह बक्षी समितीचा अहवालाचा खंड 2 लिपिक व इतर संवर्गीय वेतन त्रुटी दूर करून प्रसिद्ध करावा, रिक्त पदे तात्काळ भरा इत्यादी मागण्या करण्यात आल्या. तर या सर्व मागण्या जिल्हाधिकार्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचे आश्वासन प्रांताधिकारी यांनी दिले.
यावेळी ग्रामसेवक संघटना, महसूल, आरोग्य, पंचायत समिती, खाजगी प्राथमिक, माध्यमिक, जिल्हा परिषद, कास्ट्राईब शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे प्रदीप सोनवणे, समाधान जाधव, गौतम वाडे, मीरा जंगले, राजेंद्र ढाके, संजू भटकर, आर.आर.धनगर, सुनील वानखेडे, योगेश इंगळे, जीवन महाजन, प्रसन्ना बोरोले, देव सरकटे, भूषण झोपे, अतुल पाटील, प्रमोद खैरे, भास्कर चिमणकर, अमोल नेतकर, वर्षा ठाकूर, प्रशांत तायडे, डी.आर.जयंकर, रीजवान खान आदी उपस्थित होते.
नाहाटा महाविद्यालयातील शिक्षकांचा संपात सहभाग
भुसावळ : पु.ओ.नाहाटा महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी राज्यव्यापी संपात दुसर्या दिवशी देखील सहभाग नोंदविला. महाविद्यालयाच्या आवारात ज्युक्टो संघटनेचे पदाधिकारी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी विविध घोषणा दिल्या. महासंघाच्या आदेशानुसार 12 वीच्या परीक्षेचे काम सुरळीत चालू आहे मात्र पेपर तपासणी व इतर महाविद्यालयीन कामकाज बंद ठेवण्यात आले आहे. सरकारने सर्व कर्मचार्यांच्या व्यथा समजून लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्या एवढीच अपेक्षा कर्मचार्यांनी केली आहे.
एकच मिशन जुनी पेन्शनच्या घोषणा मुक्ताईनगर दणाणले
मुक्ताईनगर : 2005 पूर्वी शासकीय व निमशासकीय सेवेत दाखल झालेले त्यासोबतच 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वत लागू करण्यात यावी या मागणीसाठी सर्व संघटनांनी बेमुदत संप पुकारला आहे. एकच मिशन, जुनी पेन्शन या घोषणांनी मुक्ताईनगर शहर दणाणले असून या संदर्भात मागण्यांचे निवेदन तहसीलदार श्वेता संचेती यांना देण्यात आले. मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच महसूल विभाग पंचायत समिती, सामान्य प्रशासन, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, आरोग्य विभाग, ग्राम सेवक संघटना, कृषी विभाग, वन विभाग, पशुसंवर्धन विभाग अशा विविध विभागातील कर्मचार्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी शासनाकडे निवेदन सादर केले. मुक्ताईनगर येथील पंचायत समिती कार्यालयात आणि त्यानंतर मुक्ताईनगर येथील तहसील कार्यालयात शेकडो महिला पुरुष कर्मचार्यांनी एकत्र जमून घोषणा दिल्या व आंदोलन केले व त्यानंतर भव्य मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन मुक्ताईनगरच्या तहसीलदार श्वेता संचेती यांना देण्यात आले.
निवेदन देताना यांची उपस्थिती
याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष आर.पी.पाटील, मुख्याध्यापक संघाचे जळगाव जिल्हा सहकोषाध्यक्ष पी.पी.दाणे, शिक्षक लोकशाही आघाडीचे तालुकाध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर, माध्यमिक शिक्षण संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय सांगळकर तसेच प्राथमिक माध्यमिक शिक्षक मुख्याध्यापक तसेच महिला शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. जुनी पेन्शन संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष धनगर, जिल्हा सरचिटणीस सोमनाथ गोंडगिरे, जिल्हा प्रतिनिधी कल्पेश चौधरी, शिक्षक सेना तालुकाध्यक्ष रोशन कुमार साळुंखे, शिक्षक संघ तालुकाध्यक्ष विकास पाटील, मनोज पाटील, ज्येष्ठ शिक्षक मनोज लुल्हे, धनलाल भोई यांच्यासह आरोग्य सेवक विशाल चौधरी, आनंद ठाकरे, माध्यमिकचे मुकेश जुंबळे या सोबतच महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुभाष खिरोळकर, तालुका संघटक मनोज घोडके, तालुका कोषाध्यक्ष महेंद्र दुट्टे, महिला तालुका ग्रामसेवक संघटनेच्या उपाध्यक्ष ज्योती कोचुरे, संघटक शंकर इंगळे यांच्यासह असंख्य ग्रामसेवक बंधू भगिनी उपस्थित होत्या.
तहसीलदारांच्या कार्यपद्धत्तीविषयी संघटनांची नाराजी
जुनी पेन्शन योजना मिळण्यासाठी बेमुदत संपात सहभागी झालेले ेशेकडो कर्मचारी असल्याने तहसीलदार यांनी कर्मचार्यांचे निवेदन कॅबीनबाहेर येऊन स्वीकारावे, अशी विनंती पदाधिकार्यांनी केली मात्र तहसीलदार श्वेता संचेती यांनी हे निवेदन कॅबीनमध्ये स्वीकारले जाईल, अशी आडमुठी भूमिका घेतल्याने संघटनांनी नाराजी व्यक्त केली.
कर्मचार्यांच्या बेमुदत संपाला काँग्रेसचा पाठिंबा
मुक्ताईनगर तालुक्यातील संपात मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी सहभागी होऊन त्यांच्या रास्त मागण्यांना जाहीर पाठिंबा दर्शवून आंदोलनास सहभागी झाले. त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य डॉ.जगदीश पाटील, महाराष्ट्र प्रदेश जयंती विभागाचे प्रदेशाध्यक्ष अॅड.पल्लवी रेणके, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मा. बादल तुषार गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व्हीजेएनटी विभागाचे प्रवक्ते अॅड.अरविंदजी गोसावी, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष एस.ए.भोई, जिल्हा उपाध्यक्ष बी.डी.गवई, सेवादल तालुकाध्यक्ष प्रा. सुभाष पाटील, ज्येष्ठ नेते शामराव भोई, मुक्ताईनगर तालुका उपाध्यक्ष अनिल वाडीले, ओबीसी विभागाचे तालुकाध्यक्ष निखील चौधरी, तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र जाधव, बाबूलाल बोराडे, मुक्ताईनगर तालुका सेवादल महिला अध्यक्ष सुमन संजय चौधरी, हिरासिंग चव्हाण आदी उपस्थित होते.
फैजपूरात प्राचार्यांना निवेदन
फैजपूर : धनाजी नाना महाविद्यालयातील कर्मचार्यांनी देखील बेमुदत संपात सहभाग नोंदवला असून प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. फैजपूर धनाजी नाना महाविद्यालयातील कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. आमदार यांना एकदा निवडून आल्यानंतर भरघोस पगार, सुख सुविधा, मोफत प्रवास, मोफत फोन बिल, यासह एकदा निवडून आल्यावर विधिमंडळात दोन मिनिटात मंजूर झालेले भरघोस पेन्शन आणि दुसरीकडे राज्य शासकीय कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी वेळोवेळी संप पुकारावा लागत असल्याने कर्मचार्यांच्या संतप्त भावना आहेत.